उमेदच्या माध्यमातून राज्यात 1 कोटी लखपती दीदी घडविणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 20
महिला बचत गट नोंदणी अभियानाचा शासन निर्णय जारी; वंचित, स्थलांतरित व कामगार महिलांना मिळणार आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी
नवी मुंबई : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन त्यांना स्वावलंबनाकडे नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत महिला बचत गट नोंदणी मोहीम व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान राबविण्याचा शासन निर्णय 17 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आला असून, 2026 ते 2029 या कालावधीत राज्यभर हे अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अद्याप कोणत्याही स्वयं-सहाय्यता (बचत) गटाशी जोडल्या न गेलेल्या महिलांची नोंदणी करुन त्यांना बचत गटांमध्ये सहभागी करुन घेतले जाणार आहे. विशेषत ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, हंगामी स्थलांतरित महिला तसेच सामाजिकदृष्ट्या वंचित घटकातील महिलांना प्राधान्याने बचत गटांशी जोडले जाणार असून, ग्राम सखी व समुदायस्तरीय संस्थांची या मोहिमेत महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
अद्याप अनेक पात्र महिला बचत गटांच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याने या विशेष मोहिमेद्वारे अशा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जुलै ते ऑगस्ट 2026 या कालावधीत राज्यभर जनजागृती मोहीम आणि क्षमता बांधणी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांना केवळ बचत गटात सहभागी करुन न घेता, विविध शासकीय योजनांचा कृतीसंगम साधून कौशल्य विकास, वित्तीय सेवा, उद्योगविकास आणि उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाकडून लवकरच सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. या उपमामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात आत्मसन्मान, आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
देशात 6 कोटी लखपती दीदी घडविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला पुढे नेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील 1 कोटी ग्रामीण महिलांना लखपती दीदी बनविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उमेद कटिबद्ध आहे. अजूनही बचत गटांशी जोडल्या न गेलेल्या ग्रामीण भागातील महिलांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( उमेद) श्रीधर डुबे पाटील यांनी केले आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यभर व्यापक जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. स्थानिक समुदाय संस्था आणि महिलांना अभियानाच्या विविध टप्प्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या योजनांचा समन्वय साधला जाणार असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai