मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना निर्बंध
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2026
- 29
अत्यावश्यक सेवांना व रस्ते कामांच्या वाहनांना सूट
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या व परतीच्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमतेच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असल्याचे बंदी आदेश परिवहन विभागामार्फत जारी करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवपूर्व तयारी व मूर्तींचे आगमन लक्षात घेऊन दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री 12.01 वाजेपासून दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहनांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा अधिक असलेली जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीॲक्सल, ट्रेलर, ट्रक, लॉरी आदींची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमतेच्या सर्व जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जनासाठी व काही अंशी परतीच्या प्रवासासाठी दि. 19 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत आणि दि. 20 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहनांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा अधिक असलेली जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीॲक्सल, ट्रेलर, ट्रक, लॉरी आदींची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. अनंत चतुर्दशी 12 दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी व परतीच्या प्रवासासाठी दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8 वाजेपासून दि. 26 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या मार्गावरील याच प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू राहणार आहेत. नोंदणीकृत वाहनांची वजनक्षमता ठरविताना मालासह वाहनाचे एकूण वजन अर्थात टोटल ग्रॉस व्हेईकल वेट ग्राह्य धरले जाणार आहे.
- अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना निर्बंधातून सूट
या निर्बंधांमधून जेएनपीटी बंदर व जयगड बंदर येथून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, मेडिसिन, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला, नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. याशिवाय पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन व इतर अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहने निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन तसेच अन्य अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाही हे निर्बंध लागू राहणार नाहीत. - महामार्गाच्या कामांसाठी आवश्यक वाहनांना परवानगी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्तीची कामे तसेच त्यासाठी आवश्यक साहित्य, माल आदींची ने-आण करणाऱ्या वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची सुरक्षित व सुरळीत वाहतूक आणि महामार्गावरील परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक परिस्थितीनुसार जड-अवजड वाहनांवरील निर्बंध शिथील करण्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतील. तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून होणारी आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक वाहतूक नियोजन करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai