राडारोडा टाकणाऱ्या डंपरवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 22
सिडको आणि पोलिसांची संयुक्त मोहिम
नवी मुंबई : मुंबई व उपनगरातून बांधकामांचा राडारोडा नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात टाकणाऱ्या डेब्रीज माफियांचे कारनामे दिवसेंदिवस वाढले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सिडकोच्या दक्षता विभागाने आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे मोहिम राबवली. यामध्ये कुंडेवहाळ येथे तब्बल 17 डंपर आणि एक पोकलेन अवैधरीत्या राडारोडा टाकताना पकडण्यात आले. या प्रकरणी संबंधित चालकांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील बांधकामातील राडारोडा विना परवानगी नवी मुंबईतील मोकळ्या जागांमध्ये टाकला जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर सिडकोच्या दक्षता विभागाचे प्रमुख सूरेश मेंगडे आणि नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी विशेष पथके स्थापन केली आहेत. मागील काही दिवसांपासून ही पथके विविध ठिकाणी सातत्याने कारवाई करत आहेत. या मोहिमेदरम्यान 18 जुलै रोजी अटलसेतूजवळील पुलाखाली एक डंपर, तर 20 जुलै रोजी आणखी एक डंपर पकडण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांत संबंधित चालकांविरोधात उरण पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर गुरुवारी (ता.23 जुलै) दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास जेएनपीटी-नवेल महामार्गावरील कुंडेवहाळ गावाजवळील मोकळ्या जागेत 17 डंपर आणि एक पोकलेन राडारोडा टाकताना पथकाने रंगेहाथ पकडले. मात्र सिडको आणि पोलिसांचे पथक येत असल्याचे लक्षात येताच चालकांनी राडारोडा टाकून डंपर घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. पोकलेन चालकानेही यंत्र जागीच सोडून पलायन केले. या प्रकरणी संबंधित डंपर आणि पोकलेन चालकांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध राडारोडा टाकण्याविरोधातील सिडकोची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
सिडकोने ज्या पद्धतीने विशेष पथक स्थापन करून कारवाई सुरू केली आहे, त्याच धर्तीवर पनवेल आणि नवी मुंबई महापालिकांनीही स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी पनवेल महापालिकेच्या महासभेत काँग्रेसचे नगरसेवक हरेश केणी यांनी हा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
- राडारोडा प्रक्रिया केंद्राची गरज
सिडको, नवी मुंबई आणि पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. तसेच धोकादायक इमारतींची संख्या मोठी असल्याने पुनर्बांधणी आणि बांधकाम प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर प्रक्रिया करणारी संयुक्त यंत्रणा तातडीने न उभारल्यास नवी मुंबईत निर्माण होणाऱ्या राडारोड्याचा प्रश्न कायम राहील. त्यामुळे तीसऱ्या मुंबईच्या निर्माणासोबत पूर्वीच्या बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या राडारोड्याच्या प्रश्नाबाबत शासनाने मार्ग काढण्याची गरज आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai