महिला व बालकल्याणकारी 20 योजनांना मंजूरी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 30
नवी मुंबई ः महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महिला व बालकल्याणकारी 20 योजनांना महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेची सर्वानुमते मंजूरी प्राप्त झालेली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार यांनी मांडलेल्या योजनाविषयक प्रस्तावावर सदस्यांनी सविस्तर चर्चा केली. विविध सूचना व सुधारणा सुचविल्या. या सूचनांची पडताळणी करून त्यामधील सुयोग्य सूचनांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार सभागृहाने महापौर महोदयांना प्रदान केले.
महिला विकासाला पूरक व आधुनिक काळाला साजेशा अनेक योजनांचे प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून मांडण्यात आले असून या योजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी सुरु करावी असे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी दिले. या योजनांमध्ये योगा प्रशिक्षणाचाही अंतर्भाव करावा असे सूचित करतानाच महापौर महोदयांनी समूह संघटकांव्दारे या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचतील याचे नियोजन करण्याचे निर्देशित केले. महिला बचत गटांची नोंदणी, त्याचे नूतनीकरण तसेच इतर पूरक कामांसाठी समूहसंघटक आठवडयातील तीन दिवस संबंधित विभाग कार्यालयात उपलब्ध असतील याचीही दक्षता घेण्याचे महापौरांनी निर्देशित केले.
या योजनांमध्ये निराधार, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, महिला बचत गट, उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमाकरीता युवती, दुर्घर आजार असणाऱ्या महिला, अनाथ-निराश्रीत मुली, तृतीयपंथी, देहविक्रय करणाऱ्या महिला, साठ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या एकल महिला या सर्व गटातील महिलांना संबंधित योजनांनुसार व्यवसाय प्रशिक्षण, अर्थसहाय्य तसेच शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. उपमहापौर दशरथ भगत यांनी लाभार्थ्यांना योजनांच्या होणाऱ्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यांकन समिती स्थापन करावी अशी सूचना करतानाच अटी व शर्तींमध्ये काळानुरुप सुधारणा करावी असे करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांबाबत भाष्य करताना अनेक सूचना अंमलबजावणी करण्यायोग्य असल्याचे मत व्यक्त केले. यामध्ये शिष्यवृत्तीकरीता विदयार्थ्यांच्या गुणांची प्रस्तावित मर्यादा कमी करणे, महिलांना उदरनिर्वाहासाठी देण्यात येणाऱ्या साहित्य साधनांच्या प्रकारात व्यापकता आणणे, देहविक्री करणाऱ्या महिलांचा आत्मसन्मान राखून त्यांना स्वयंसहाय्यता देण्यासाठीचे प्रशिक्षण देणे, तृतीयपंथी घटकांना प्रशिक्षणाव्दारे रोजगार उपलब्धतेसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे शालेय विदयार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या बसेसवरील चालक आणि बसेसची वेळ निश्चिती करणे, खाजगी शाळांप्रमाणेच बसने प्रवास करणाऱ्या विदयार्थ्यांना ओळखपत्र वितरण, शिष्यवृत्ती अर्जातील वारंवारता टाळून ही प्रक्रिया गतीमान करण्याचे नियोजन, महिलांनी निर्माण केलेल्या साहित्य विक्रीसाठी जागा उपलब्धता, योजनांसाठीचे अर्ज भरण्यासाठी ॲप सुविधा उपलब्धता या सूचनांचा उल्लेख त्यांनी केला. नवी मुंबई क्षेत्र आधुनिक विकासाकडे वाटचाल करत असून विमानतळ, डेटा सेंटर, हॉस्पिटॅलिटी हब याचा विचार करुन त्याला अनुरुप व्यवसाय प्रशिक्षण देण्याबाबतही सकारात्मक पावले उचलण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. सर्व सदस्यांच्या सहमतीने महिला व बालकल्याण घटकांतर्गत कल्याणकारी 20 योजना राबविण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai