विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छता दिंडी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 32
स्वच्छता व पावसाळी पाण्याच्या संग्रहण संदेशाचा जागर
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 अंतर्गत ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ हे अभियान देशभरात राबविले जात असून अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने लोकसहभागातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. असाच स्वच्छतेमधून आरोग्य जपणुकीचा संदेश प्रसारित करणारा ‘स्वच्छता दिंडी’ हा अभिनव उपक्रम करावे येथील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयाच्या सहयोगाने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अत्यंत उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात 650 हून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक पारंपारिक वेशात सहभागी झाल्याने हा दिंडी सोहळा अत्यंत लक्षणीय झाला.
नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेच्या दिंडी उपक्रमात शाळेची माजी विद्यार्थिनी आणि नवी मुंबईची प्रथम नागरिक म्हणून सहभागी होता आले याचे वेगळेच समाधान असल्याचे सांगितले. आपल्या महाराष्ट्राला भक्तीची मोठी परंपरा असून वर्षोनुवर्षे निघणाऱ्या आषाढी वारीतून एकात्मता आणि बंधुभावाचे दर्शन घडते. हीच भावना जपत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता दिंडीतून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संरक्षण संवर्धन, पावसाळी पाण्याचे संग्रहणाव्दारे नियोजन असे विविध संदेश प्रसारित होत असल्याबद्दल महापौरांनी आनंद व्यक्त केला.
नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने करावेगाव येथी ज्ञानदीप शाळेच्या माध्यमातून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ मध्ये सुरू असलेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत आयोजित स्वच्छता दिंडी उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी पालखी पूजन झाल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आयुक्त डॉ.कैलास शिंदे, नगरसेविका संतोषी म्हात्रे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त प्रशांत नेरकर, मुख्य स्वच्छता अधिकारी राजुसिंह चव्हाण आणि नरेश अंधेर तसेच ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष रविंद्र नाईक, सचिव अरविंद नाईक, प्रसाद तांडेल, परशुराम पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, मुख्याध्यापक बंकट तांडेल, रत्नाकर तांडेल, सुरेश चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आषाढी एकादशीनिमित्त सगळीकडून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले असताना आपल्या लहान मुलांनाही वारीचे महत्व कळावे व दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून त्यांना आपल्या परंपरेची, संस्कृतीची माहिती व्हावी तसेच स्वच्छतेचा व पर्यावरणाचा संदेश त्यांच्या मनात रूजावा यादृष्टीने ज्ञानदीप विद्यालयाच्या सहकार्याने स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. पुढील वर्षी या परिसरातील विविध शाळांतून दिंड्या काढून विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन त्या एकत्र येतील व दिंडी सोहळा साजरा करतील असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा तसेच ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची अभंग गाथा ठेवलेल्या पालखीचे महापौर सुजाता पाटील, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, नगरसेविका संतोषी म्हात्रे आणि मान्यवरांच्या हस्ते पूजन करून ज्ञानदीप सेवा मंडळाच्या विद्यालयापासून सुरू झालेल्या या स्वच्छता दिंडी सोहळ्यात श्रीविठ्ठल, श्रीरखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई अशा संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी सहभाग घेतला.
‘पंढरीनाथ महाराज की जय’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नामगजरात लेझीम, टाळ मृदुंग, शालेय बँडच्या गजरात शाळेपासून सीवूड येथील नेक्सस मॉलपर्यंत जाताना दिंडीतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता संदेशाचे, प्लास्टिक प्रतिबंधाचे तसेच कॅच द रेन अभियानाचे फलक झळकावित, घोषणा देत स्वच्छता संदेशाचे प्रसारण केले. नेक्सस मॉलच्या पोडियमवर वारीच्या परंपरेनुसार रिंगण घालण्यात आले. यावेळी सहावीतील विद्यार्थिनी कु. वैष्णवी हाडे हिने ‘मला प्लास्टिक नको गं बाई’ हे भारूड ढंगदार शैलीत सादर केले. स्मित शिगवण, सोहम साळुंखे या विद्यार्थ्यांनीही स्वच्छता संदेश देणारे भारूड सादर केले. बँडच्या लयदार ठेक्यावर विद्यार्थिनींनी लेझीमची सुंदर प्रात्यक्षिके सादर केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai