दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे अर्थसहाय्य
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 25
विवाह, उच्च शिक्षण आणि मासिक उदरनिर्वाह भत्त्यासाठीच्या प्रस्तावास मंजूरी
पनवेल ः महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजुर करण्यात आला. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांना अधिक प्रभावी आर्थिक आधार मिळला असून त्यांच्या स्वावलंबी जीवन जगण्यासाठी मोठी चालना मिळाली आहे.
महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत सध्या उदरनिर्वाह व व्यवसायासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी आर्थिक मदत, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच अतितीव्र (बिछान्याला खिळलेल्या) दिव्यांगांना मासिक उदरनिर्वाह भत्ता अशा विविध योजना महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहेत. वाढती महागाई, औषधोपचाराचा खर्च आणि जीवनावश्यक गरजांचा विचार करून या योजनांमधील आर्थिक सहाय्य वाढविण्याचा निर्णय महासभेत प्रस्तावित करण्यात आला होता, हा विषय मंजूर झाल्याने महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांमध्ये उत्साहाचे वातवरण निर्माण झाला आहे. महापालिका क्षेत्रातील सुमारे 2,021 दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार उदरनिर्वाह, व्यवसाय किंवा आवश्यक साहित्य खरेदीसाठी थेट बँक खात्यात निधी जमा करण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेत 40 ते 60 टक्के दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांऐवजी 24 हजार रुपये, 61 ते 80 टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना 18 हजार रुपयांऐवजी 36 हजार रुपये, तर 81 ते 100 टक्के दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना 24 हजार रुपयांऐवजी 48 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाआहे. या योजनेसाठी सुमारे 4.77 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक पुनर्वसनाला चालना देण्यासाठी विवाह अर्थसहाय्य वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार एका व्यक्तीला दिव्यांगत्व असल्यास सध्या मिळणारे 25 हजार रुपये वाढवून 50 हजार रुपये, तर दोन्ही नवदांपत्य दिव्यांग असल्यास 40 हजार रुपयांऐवजी 80 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
वैद्यकीय, अभियांत्रिकी, पीएच.डी. आणि एमबीए यांसारख्या पूर्णवेळ व्यावसायिक व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ता प्राप्त दिव्यांग विद्यार्थ्यांना एकरकमी 25 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती , ही रक्कम वाढवून 50 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अधिक आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
बिछान्याला खिळलेल्या अतितीव्र दिव्यांगांना दरमहा 3 हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता दिला जात होता, वाढत्या वैद्यकीय खर्चाचा विचार करून हा भत्ता वाढवून दरमहा 6 हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे औषधोपचार व दैनंदिन वैद्यकीय खर्चासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
- स्वावलंबी जगण्यासाठी मिळणार बळ
प्रस्तावित करण्यात आलेली वाढ ही केवळ आर्थिक मदत नसून, दिव्यांग बांधवांना सन्मानाने, स्वाभिमानाने, स्वावलंबी आणि सक्षम जीवन जगण्यासाठी दिलेले बळ आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी आणि सन्मान मिळावा, या भूमिकेतून पनवेल महानगरपालिका दिव्यांगांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे महापौर नितीन पाटील यांनी सांगितले. महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या चारही योजनांच्या अर्थसहाय्यात वाढ झाल्याने दिव्यांग बांधवांना आर्थिक स्थैर्य, स्वावलंबन आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक बळ मिळणार असल्याचा विश्वास दिव्यांग विभाग उपायुक्त रविकिरण घोडके यांनी व्यक्त करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai