क्रशर व खाण उद्योगाला मोठा दिलासा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 29
बंद ट्रेडिंग लायसन्स पूर्ववत सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील क्रशर चालकांचे बंद असलेले ट्रेडिंग लायसन्स पूर्ववत सुरू करणे आणि सिडको क्षेत्रातील जमीन सपाटीकरणाबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील स्टोन क्रशर संघटना व खाण व्यावसायिकांच्या प्रलंबित समस्यांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला आमदार विक्रांत पाटील आणि रायगडमधील खाण व्यावसायिक उपस्थित होते. या बैठकीमुळे एप्रिल महिन्यापासून अडचणीत सापडलेल्या स्थानिक क्रशर व खाण उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. बैठकीदरम्यान खाण मालकांनी आणि क्रशर चालकांनी आपल्या व्यथा मांडल्या. एप्रिल महिन्यापासून महसूल आणि प्रशासकीय पातळीवर क्रशर तसेच खाण परिसराला सील ठोकण्यात आल्याने संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे, अशी माहिती व्यावसायिकांनी महसूलमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक बांधकामांना आवश्यक असणाऱ्या खडी आणि दगडाचा पुरवठाही बाधित झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत लीज (पट्टा) नूतनीकरणाच्या अर्जांवर सविस्तर चर्चा झाली. यावर बोलताना सिडकोच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अडचण स्पष्ट केली. लीज नूतनीकरणाचे अर्ज प्राप्त झाले आहेत; मात्र प्रादेशिक नियोजन झोनच्या (रिजनल प्लॅनींग झोन) नियमानुसार या क्षेत्रात क्रशर चालवण्यास परवानगी देणे नियमात बसत नाही, असे सिडकोतर्फे सांगण्यात आले. या तांत्रिक अडचणीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. यावर महसूलमंत्र्यांनी संबंधित भाग हा मूळ खाण क्षेत्र असेल, तर त्याचा समावेश प्रादेशिक उद्यान क्षेत्रात होत नाही, केवळ गार्डन किंवा इतर पार्कसाठी आरक्षण असलेल्या ठिकाणी नियमाधीन राहून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
उद्योगाला मोठा दिलासा
सिडको क्षेत्रातील जमीन सपाटीकरण (लॅन्ड लेव्हलींग) आणि प्रादेशिक नियोजनातील आरक्षणांच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे रायगडमधील क्रशर उद्योग एप्रिलपासून कायदेशीर पेचात अडकला होता. मात्र, महसूलमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक निर्देशांमुळे बंद पडलेले ट्रेडिंग लायसन्स पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या बैठकीमुळे रायगडमधील हजारो खाण व्यावसायिक, वाहतूकदार आणि या उद्योगावर अवलंबून असलेल्या स्थानिक कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून, येत्या काही दिवसांत याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (जीआर) किंवा प्रशासकीय आदेश निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जर संबंधित भाग मूळ खाण क्षेत्र (ओरिजनल मायनिंग झोन) असेल, तर त्याचा समावेश प्रादेशिक उद्यान क्षेत्रात (रिजनल पार्क झोन) होत नाही. त्यामुळे केवळ गार्डन किंवा इतर पार्कसाठी विशेष आरक्षण असलेल्या ठिकाणी नियमाधीन राहून पुढील कार्यवाही करावी. उर्वरित मूळ खाण क्षेत्रातील क्रशर आणि ट्रेडिंग लायसन्सबाबत नियमांच्या चौकटीत राहून निर्णय जलद गतीने घ्यावा. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री-महाराष्ट्र.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai