नागरी सुविधांसोबत नागरिकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2026
- 20
धोकादायक इमारती, होर्डिंग्ज आणि फेरीवाल्यांवर कारवाईचे निर्देश
नवी मुंबई ः नागरी सुविधा पुरविण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व देत महानगरपालिका क्षेत्रातील अतिधोकादायक ‘सी-1’ श्रेणीतील इमारती तातडीने रिकाम्या करून त्यांचा वीज, पाणीपुरवठा आणि मलनि:स्सारण सेवा खंडित कराव्यात, तसेच विनावापरातील पडीक बांधकामांचे विभागनिहाय सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार निष्कासनाची कार्यवाही त्वरित प्रस्तावित करून अंमलात आणावी, असे निर्देश नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिकेच्या विविध विभागांच्या आढावा बैठकीत दिले.
देशातील विविध शहरांमध्ये घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही विशेष सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील सर्व कोचिंग क्लासेस व शिकवणी वर्गांचे तातडीने अग्निसुरक्षा (फायर सेफ्टी) ऑडिट करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच या संस्थांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणि अन्य आवश्यक कागदपत्रे महापालिकेच्या परवाना विभागाकडे सादर करावीत, अशा सूचना प्रसिद्ध करण्यासही सांगितले. शहरातील होर्डिंग्जबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून स्वतंत्र धोरण तयार करावे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी निर्देशित केले. न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मोहिमा अधिक तीव्र करून दंडात्मक कारवाई वाढवावी, तर अधिकृत फेरीवाल्यांना निश्चित हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित करून रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी धोरण आखण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली परवाना प्रक्रियेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी दक्ष ॲपचा प्रभावी वापर करण्याबरोबरच कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कॅमेरे बसवून रस्त्यांच्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याची व्यवस्था विकसित करण्यास सांगण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार दररोज 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी शासकीय पोर्टलवर नोंदणी करून आपल्या परिसरातच कचऱ्याची विल्हेवाट लावणारे प्रकल्प उभारावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.शिक्षण विभागाला महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टपूर्वी शालेय गणवेशांचे वितरण पूर्ण करण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. तर आरोग्य विभागाने पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवून आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, असे निर्देश देण्यात आले.याशिवाय महसूलवाढीसाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावांची तातडीने अंमलबजावणी करावी आणि प्रत्येक विभागाने निश्चित उद्दिष्टपूर्तीकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai