गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी पालिकेची कटिबध्दता
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2026
- 23
नवी मुंबई ः महापालिकेच्या आरोग्य सेवांमधील गुणवत्ता वाढीकडे बारकाईने लक्ष देत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने आरोग्य सेवांचा नियमित आढावा घेतला जात आहे. या अनुषंगाने झालेल्या बैठकीत महापालिका रूग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जात असलेल्या आरोग्य सुविधा नागरिकांना समाधानकारक आणि विश्वासार्ह वाटण्याच्या दृष्टीने विविध सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महानगरपालिका क्षेत्रातील जन्मदर व मृत्यूदराचा वर्षनिहाय आढावा घेताना आयुक्तांनी जन्माच्या नोंदीचा तपशील दैनंदिन स्वरूपात गुगल शीटवर अपलोड करण्यात यावा व त्याच्या दररोज अद्ययावत नोंदी ठेवण्यात याव्यात असे निर्देश दिले. रूग्णांचे व्यवस्थापन अधिक नियोजनबध्द रितीने करण्यासाठी महापालिकेतील डॉक्टरांसाठी इतर तज्ज्ञ डॉक्टरांची प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन मार्गदर्शक शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात यावी व त्यात सातत्य ठेवावे अशा सूचना आयुक्तांनी केल्या. त्याचप्रमाणे महिला गरोदर होण्यापासून प्रसूती नंतरही तिच्या आरोग्याबाबत संपर्कात असणाऱ्या आशा स्वयंसेविका, आशा, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ यांचीही प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात यावीत व डेथ ऑडिट करताना त्यांचीही उपस्थिती असावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
आपल्या रूग्णालयांतील एनआयसीयू युनिट्सची संख्या वाढविण्याचेही सूचित करण्यात आले. सिझरिनच्या वाढत्या प्रमाणाच्या कारणांचाही शोध घ्यावा असे त्यांनी सांगितले. नागरिकांना मोठ्या आजारावरील उपचारांसाठी शासनाचे आयुष्मान कार्ड हे वरदान असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व लाभार्थी घटकांच्या हातात प्रत्यक्ष आयुष्मान कार्ड मिळण्याच्या प्रक्रियेला वेग द्यावा, त्यासाठी शासन स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा असे निर्देशित करतानाच शासन स्तरावर आपणही याबाबत संपर्क साधू असे आयुक्तांनी सांगितले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ नमुंमपा क्षेत्रातील 29 रूग्णालयांमध्ये मिळत असून त्याची यादी लोकप्रतिनिधींना द्यावी व व्यापक रितीने प्रसिध्द करावी अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. महापालिकेमार्फत या योजनेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा व आरोग्य मदत कक्ष तयार करावा असेही निर्देश देण्यात आले.
क्षयरोग निर्मुलनासाठीचे काम अधिक व्यापक स्वरूपात करतानाच क्षयरोगी व्यक्तींना देण्यात येणारा पोषण आहाराविषयी पालिकेमार्फतही कशा पध्दतीने मदत करता येईल याची पडताळणी करण्याचे निर्देशित करण्यात आले. याबाबत दर 3 महिन्याला शिबिरे आयोजित करण्यात यावीत असेही त्यांनी सांगितले. सध्या पावसाळी कालावधीत डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहीमांना गती द्यावी व आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन विभागांनी एकत्रित मोहीमा राबवाव्यात तसेच बांधकाम साईट्स, गावठाण, एलआयजी व झोपडपट्टी भाग यावर विशेष लक्ष केंद्रीत करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. धूरीकरण मोहीमाही नियमित सुरू ठेवाव्यात आणि मूषक नियंत्रणाकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. नवी मुंबईकर नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्हता देणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपत यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठीही गतिमान कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आरोग्य विभागास देतानाच याकामी लोकप्रतिनिधींचेही सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai