सत्ताधाऱ्यांचा ‘नैवेद्य’ वर ताव, चौकशीत उलटणार डाव?
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 07, 2026
- 38
चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी; मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याने प्रकरणापासून राखले अंतर
नवी मुंबई ः वाशीतील नैवेद्य या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिले म्हणून कांगावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे जाधव यांच्या सांगण्यावरुन केकाण यांना कार्यमुक्त करण्याचा सत्ताधाऱ्यांचा ठराव वादात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, यांनी नैवेद्यचा ना हरकत दाखला अजूनपर्यंत रद्द न केल्याचे बोलले जात असल्याने सत्ताधारीच तोंडघशी पडल्याची चर्चा सध्या पालिकेत आहे.
गेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने सभागृहनेते सागर नाईक यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनाला नैवेद्य इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिले म्हणून कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, हा प्रयत्नही नेहमीप्रमाणे फोल ठरल्याचे चित्र असून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना तोंडघशी पडावे लागलेआहे. अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्या खाद्यावर बंदुक ठेवून उडवलेला बार अखेर फुसका निघाल्याने नैवेद्य प्रकरण सत्ताधाऱ्यांवरच बुमरँग झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सोनवी लाड यांच्या प्रभागातील नैवेद्य इमारतीला चुकीच्या पद्धतीने अग्निशमन विभागाने ना हरकत दाखला दिला व त्यालाअनुसरुन भोगवटा प्रमाणपत्र दिले असा आरोप ठेवून अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांची चौकशी करुन निलंबनाचा ठराव गेल्या महिन्याच्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावित करण्यात आला होता. एका इमारतीला चुकीच्या पद्धतीने भोगवटा प्रमाणपत्र दिले म्हणून दिवसभर चर्चेचे गुऱ्हाळ सभागृहात करण्यात आले. यावेळी अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी आपल्यावर वरिष्ठांचा दबाव असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत केला. त्यामुळे सभागृहातील चर्चा जाधव यांच्या निलंबनावरुन केकाण यांच्या कार्यमुक्तीचा ठराव करण्यापर्यंत रंगली. परंतु, सदर ठरावाची अमंलबजावणी अद्याप झाली नसल्याने उलटसुलट चर्चा पालिकेत आहे.
पालिका आयुक्तांनी याबाबत अग्निशमन संचालक वारिक व सहसंचालक नगररचना विजय कुमार वागमोडे यांची चौकशी समिती नेमली असून या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. केकाण यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप करणाऱ्या जाधव यांनी यापुर्वी 2023 मध्येही सदर इमारतीस ना हरकत दाखला दिल्याची बाब उघडकीस आली आहे. अग्निशमन संचालक यांनी 20 ऑक्टोबर 2010 रोजी 15 मीटरपेक्षा उंच असणाऱ्या इमारतींना दोन जिने अत्यावश्यक असल्याचे परिपत्रक काढले होते. या परिपत्रकाची अमंलबजावणी नगरविकास विभागाने 21/2/2011 रोजी करण्याचे निर्देश सर्व नियोजन प्राधिकरणांना दिले होते. परंतु, नैवेद्यला अग्निशमन विभागाने दिलेला ना हरकत दाखला हा 12 मार्च 2010 चा असल्याने व बांधकाम परवानगी 11 जुन 2010 ची असल्याने हे परिपत्रक लागू नसल्याचे बोलले जाते. मुंबई उच्च न्यायालयाने अशाचप्रकारचा निर्णय जनहितयाचिका क्र. 13/2022 मध्ये दि. 8/04/2025 रोजी दिला असल्याने सत्ताधाऱ्यांनी केलेली सर्व मेहनत व घालवलेला वेळ वाया गेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे याही प्रकरणात सत्ताधाऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता असून बळी मात्र अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांचा जाणार असल्याचे बोलले जात आहे.
- आरदवाड नामानिराळे कसे?
पालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड हे 2019 पासून अग्निशमन विभागात मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. यासंपुर्ण प्रकरणात मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्यावर एकही आरोप सत्ताधाऱ्यांनी केला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, आरदवाड हे वनमंत्री गणेश नाईक यांचेही काम पाहत असल्याने त्याची परतफेड सत्ताधाऱ्यांनी केली असून सुळावर मात्र पुरुषोत्तम जाधव यांना चढवले असल्याचे बोलले जात आहे. - जाधव यांचे सूचक मौन
पालिका आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीत अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी मौन पाळले असून समितीने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद न दिल्याचे सुत्रांकडून कळत आहे. दरम्यान, अग्निशमन कायद्यात दिलेला ना हरकत दाखला रद्द करण्याची तरतूद नसल्याने तो कोणत्या कायद्याखाली रद्द केला याबाबतही त्यांनी मौन पाळल्याचे बोलले जाते. कोणताही निर्णय हा मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या मंजुरीने होत असतानाही आरदवाड यांना चौकशीबाहेर का ठेवले? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. - अधिकाऱ्यांना नोटीसा
नैवेद्य प्रकरणात पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीचा तपशील वनमंत्री गणेश नाईक यांना दिल्याप्रकरणी पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची चर्चा सध्या पालिकेत दबक्या आवाजात सुरु आहे. या नोटीसाला संबंधित अधिकारी काय उत्तर देतात व त्यावर आयुक्त काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai