मुंबईचा बाप्पांना भव्य निरोप
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 26, 2026
- 28
विसर्जनाच्या दिवशी 16,000 हून अधिक मूर्तींचे विसर्जन
मुंबईभर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि पारंपरिक ढोल-ताशांचा ताल दुमदुमला. उत्सवाच्या अंतिम, म्हणजेच 12 व्या दिवशी हजारो भाविकांनी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजेपर्यंत 16,154 गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अंतिम दिवसाच्या मिरवणुकांमध्ये लाखो भाविक सहभागी होऊनही कोठेही कोणतीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही, असे पालिकेने सांगितले. ध्वनी प्रदूषण टाळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि डीजे प्रणालीच्या विरोधात नागरी समाजाची मोहीम असूनही, दिवसभर अनेक मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात संगीत आणि फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. गुलालाच्या मोठ्या वापरामुळे शहरातील रस्ते गुलाबी रंगाने माखले होते.
गणेश मंडळांच्या 772 सार्वजनिक गणपती मूर्तींव्यतिरिक्त, दिवसभरात 14,864 घरगुती मूर्ती आणि 518 गौरी/हरतालिका मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रसिद्ध लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक रात्री 11 च्या सुमारास खडा पारशी पुतळ्याजवळ पोहोचली होती, तर चिंचपोकळी चिंतामणीची मिरवणूक आर्थर रोड जंक्शनवर होती. अनेक प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सकाळी उत्साही जयघोष, पारंपरिक संगीत आणि गुलाल व फुलांच्या पाकळ्यांच्या उधळणीसह सुरू झाल्या. दुपारपर्यंत एकूण 5,715 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. लालबाग-परळ भागात महिला आणि मुलांसह मोठ्या संख्येने भाविक जमले होते.
गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, करी रोडचा कैवारी, परळचा राजा, काळाचौकीचा महागणपती आणि तेजुकाया मॅन्शनचा गणपती यांसारख्या इतर प्रसिद्ध गणेश मूर्तींच्या मिरवणुका सकाळी 11 वाजण्यापूर्वीच सुरू झाल्या. अनेक मिरवणुकांसोबत पारंपरिक ढोल-ताशा पथके होती, तर भाविक भक्तीगीतांच्या तालावर नृत्य करत होते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सुरक्षित विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी मुंबई पोलीस आणि बीएमसीने व्यापक व्यवस्था केली होती. महानगरपालिकेने 67 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 383 कृत्रिम तलावांवर जीवरक्षक, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके आणि क्रेन तैनात केल्या होत्या.
गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी (25 सप्टेंबर) सांगता झाली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यभरातील गणेश मंडळांनी बाप्पाचं विसर्जन केलं आहे. ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत भाविकांनी आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप दिला.
मुंबई आणि पुण्यात शनिवारीही गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकजण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा हा देशभरातील भाविकांसाठी लक्षणीय सोहळा असतो. मुंबईचा राजा, परळचा महाराजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा या गणपतींचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन होत असतं. या गणपती बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची जंगी मिरवणूक निघते. यावर्षी मुंबईत दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (26 सप्टेंबर) सकाळी 11 पर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.
- 23 तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न
मुंबईतील लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी दुपारी सुरू झाली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी लालबागचा राजा गिरगांवच्या समुद्रकिनारी दाखल झाला होता. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर अखेर लालबागच्या राजाचं गिरगांव चौपाटीवर विसर्जन संपन्न झालं आहे. मुंबईतील लालबागच्या राजाचं 22 ते 23 तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजाचं स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने विसर्जन पार पडलं आहे. - विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे नियम धुळीस
मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक आदेशानंतरही यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस मिळाल्याचे समोर आले आहे. 25 आणि 26 सप्टेंबर रोजी झालेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मुंबईत अनेक ठिकाणी उच्च तीव्रतेचा आवाज नोंदवला गेला. आवाज फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, मागील वर्षांच्या तुलनेत गणेशोत्सवातील मंडळांकडून लाऊडस्पीकरचा वापर कमी झाला असला, तरी राजकीय पक्षांच्या बूथवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण झाल्याचं दिसून आलं. मुंबईतील विसर्जन मिरवणुकीत सर्वाधिक आवाजाची नोंद वरळी आणि वांद्रे पश्चिम भागात झाली असून, येथे ध्वनी पातळी 107.8 डेसिबलपर्यंत पोहोचली होती. राजकीय पक्षांचे बूथ, लाऊडस्पीकर आणि बँजोच्या वापरामुळे रात्री उशिरापर्यंत आवाजाची मर्यादा ओलांडली गेल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai