नवी मुंबईत क्लस्टरचा श्रीगणेशा कधी?
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 26, 2026
- 27
ठाण्यात क्लस्टर भूमीपूजन; नवी मुंबईत मात्र संघर्ष
एकनाथ शिंदेंचा एमएमआरमध्ये क्लस्टरला प्राधान्य देण्याचा निर्धार
नवी मुंबई : ठाण्यातील सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेशातील प्रमुख शहरांमध्ये समूह पुनर्विकास अर्थात ‘क्लस्टर’ योजना अधिक व्यापकपणे राबविण्याचे संकेत दिले. ठाण्यानंतर कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि नवी मुंबईतील क्लस्टर व पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, नवी मुंबईतील क्लस्टरच्या आखणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतलेल्या आक्षेपाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या भूमिकेमुळे नवी मुंबईत क्लस्टरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर परिसरातील क्लस्टर योजनेचा भूमिपूजन सोहळा बुधवारी पार पडला. सुमारे 20 हेक्टर म्हणजेच 50 एकर परिसरात हा प्रकल्प विकसित करण्यात येणार असून, सुमारे 6 हजार कुटुंबांना सुरक्षित व दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केवळ जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती उभारण्याऐवजी ‘सिटी विथिन द सिटी’ संकल्पनेनुसार नियोजित टाऊनशिप विकसित करण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. या क्लस्टरमध्ये मोठे रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, उद्याने, मैदाने, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योगा सेंटर, इनडोअर गेम्स, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग अशा 23 नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण करून नियोजित पद्धतीने परिसराचा विकास करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
30 लाख घरांचे लक्ष्य
मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि घरांची गरज लक्षात घेऊन पुढील 15 वर्षांत 30 लाख घरे उभारण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी ठाण्यासह मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील क्लस्टर व पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातूनही विविध गृहप्रकल्प राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकास हा केवळ जुन्या घरांच्या जागी नवीन इमारती उभारण्याचा प्रकल्प नसून हजारो कुटुंबांच्या ‘जीवनाची पुनर्बांधणी’ असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. गेल्या 20 वर्षांच्या संघर्षानंतर क्लस्टर योजनेला गती मिळाली असून, धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविल्याचेही त्यांनी सांगितले. किसननगर क्लस्टरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. विकासकांनी नागरिकांना वेळेत घरे देण्याबरोबरच चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच मोठा टीव्ही भेट म्हणून द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
नवी मुंबईत मात्र क्लस्टरवरून मतभेद
एकीकडे राज्य सरकारकडून एमएमआरमधील क्लस्टरला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली जात असताना नवी मुंबईत मात्र या योजनेच्या अंमलबजावणीवरून मतभेद निर्माण झाले आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील क्लस्टरच्या आखणीवर आक्षेप घेतला असून, मनमानी पद्धतीने एफएसआयचा वापर करून पुनर्विकास करण्यास विरोध दर्शविला आहे. नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजपनेही क्लस्टर प्रकल्पांच्या परिणामांचा सविस्तर अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही प्रकल्पाला मान्यता देऊ नये, असा अशासकीय ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे. अनिर्बंध पुनर्विकासामुळे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढून पायाभूत सुविधांवर अतिरिक्त भार पडू शकतो, अशी भूमिका या ठरावाच्या वेळी भाजप नेत्यांनी मांडली होती.
सिम्प्लेक्स प्रकल्प ठरणार केंद्रबिंदू
घणसोलीतील माथाडी कामगारांची वसाहत असलेल्या सिम्प्लेक्स परिसरातील क्लस्टर पुनर्विकासाचा मुद्दा या मतभेदाच्या केंद्रस्थानी आहे. नवी मुंबई महापालिकेने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली आहे. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी भाजपने त्यास विरोध केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी घणसोलीतील दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहिलेल्या शिंदे यांनी क्लस्टर योजना राबविली जाणारच असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. आता ठाण्यातील कार्यक्रमात त्यांनी नवी मुंबईसह एमएमआरमधील प्रमुख शहरांमध्ये क्लस्टरला अधिक व्यापक स्वरूपात गती देण्याचे संकेत दिल्याने सिम्प्लेक्ससह नवी मुंबईतील क्लस्टर प्रकल्पांबाबत पुढील काळात शिंदे आणि नाईक यांच्या भूमिकांमध्ये मतभेद अधिक ठळक होण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai