जेन-झी चा ज्ञानेश कुमारांना अल्टिमेटम
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 02, 2026
- 28
शिवाजी पार्कवर आंदोलनाला मोठी गर्दी; मोदी-फडणवीसांवरही दिपकेंचा हल्लाबोल; राजीनाम्याची जोरदार मागणी करत जनआक्रोश
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जेलभरो’ आंदोलनाला मोठी गर्दी झाली. आंदोलनाचे नेतृत्व सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारसह निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.‘ज्ञानू, इट्स डन ब्रो... आता राजीनामा द्या’ असा थेट इशारा देत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
विशेषतः मतदार यादीच्या पुनरावलोकनासाठी राबविण्यात येणाऱ्या एसआयआर प्रक्रियेवर आंदोलनकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी 2025च्या मतदार यादीचा आधार घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. मोदी यांच्या विविध सार्वजनिक वक्तव्यांचा तसेच नोटबंदी, कोरोना काळातील लसीकरण आणि मतदार नोंदणीचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. “मोदींना दुसरं काहीच काम येत नाही, फक्त लोकांना रांगेत उभं करतात,” असा आरोप केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आंदोलनकर्त्यांबाबतच्या वक्तव्याचा संदर्भ देत, ‘तीन दिवस नव्हे तर तीन महिने जेलमध्ये टाका’, असे आव्हानही त्यांनी दिले. ‘तुमच्या खुर्चीचा एक पाय फेव्हिकॉलचा, तर दुसरा फेव्हिस्टिकने चिकटवलेला आहे,’ अशी टीका करत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या स्थैर्यावरही भाष्य केले. महाराष्ट्राला महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांना धमक्या देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेचा मुद्दा उपस्थित केला.
मतदानाचा अधिकार आणि लोकशाही मूल्यांचा उल्लेख करत दिपके यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान, आंदोलनाला काही चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही उपस्थित राहून पाठिंबा दर्शवल्याचे आयोजकांनी सांगितले. अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी आंदोलनस्थळी जाऊन अभिजीत दिपके यांची भेट घेतली. दोघांनी गळाभेट घेतल्याचा व्हिडीओ दिपके यांनी सोशल मीडियावर शेअर केला. अभिनेत्री शबाना आझमी, गायक-संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह काही कलाकारांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाकडे विशेष लक्ष वेधले गेले. आंदोलनकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून राजकीय व सामाजिक पातळीवर चर्चा रंगली आहे. मात्र, एसआयआर आणि मतदार यादीसंदर्भातील दावे-आक्षेप याबाबत संबंधित अधिकृत संस्थांची भूमिका स्वतंत्रपणे महत्त्वाची ठरणार आहे.
- कलाकारांची उपस्थिती ठरली चर्चेचा विषय
शिवाजी पार्कवरील आंदोलनात नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि विशाल ददलानी यांच्यासह काही कलाकार उपस्थित राहिल्याचे आयोजकांनी सांगितले. नसीरुद्दीन शाह यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आंदोलनाला आणखी प्रसिद्धी मिळाली.
सीजेपीने शुक्रवारी मुंबईत केलेल्या आंदोलनाला पुणे, नाशिक, रायगड, ठाणे येथील तरुणांनी सहभागी होत अभुतपुर्व प्रतिसाद दिला. हे आंदोलन सायंकाळी संपले असून आता दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai