तुर्भे पूल आणि पामबीच रोडवर वाहतूकबंदी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 27, 2026
- 27
पुनर्बांधणीमुळे पूल चार महिने तर फॉर्म्युला-4 रेसमुळे पामबीच 13 दिवस बंद
नवी मुंबई : नवी मुंबईकरांना आगामी काळात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सायन-पनवेल महामार्गावरील तुर्भे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम आणि पामबीच रोडवर आयोजित फॉर्म्युला-4 कार रेस स्पर्धेमुळे शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. तुर्भे पुलाचा ठाण्याकडून वाशी-मुंबईकडे जाणारा मार्ग 31 मार्च 2027 पर्यंत बंद राहणार असून, सीवुड्स परिसरातील काही रस्ते 7 डिसेंबरपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत वाहतूक पोलिसांनी स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या आहेत.
तुर्भे रेल्वे उड्डाणपूल अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याने त्याचे विघटन करून पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मे. एस.एम.सी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून हे काम केले जाणार आहे. त्यामुळे 25 नोव्हेंबर 2026 रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून 31 मार्च 2027 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ठाण्याकडून तुर्भेमार्गे वाशी-मुंबईकडे जाणारा पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. दुसरीकडे, पामबीच रोड आणि नेरूळ पश्चिम परिसरात 4 ते 6 डिसेंबरदरम्यान ‘इंडियन रेसिंग फेस्टिव्हल नवी मुंबई नाईट स्ट्रीट रेस’ आणि फॉर्म्युला-4 इंडियन चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी रेसिंग ट्रॅक उभारणीचे काम सुरू असून, सुरक्षेच्या कारणास्तव 25 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून 7 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत गणपतशेठ तांडेल मैदान, सीवुड्स येथून वाशीकडे जाणारा मार्ग तसेच बेलापूरकडून सीवुड्सकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
एकीकडे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय कार रेस स्पर्धेची तयारी यामुळे नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
असे असतील पर्यायी मार्ग
तुर्भे पुलासाठी :
1. ठाण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी शिरवणे ब्रीज किंवा एलपी ब्रीजखालून उजवे वळण घेऊन जुईनगर-तुर्भे ओव्हरब्रिजमार्गे जावे. 2. अवजड वाहनांनी एलपी ब्रीजखालून उजवे वळण घेऊन शिरवणे-जुईनगर-तुर्भे ओव्हरब्रिजमार्गे मुंबईकडे जावे.
फॉर्म्युला-4 रेससाठी :
1. सीवुड्सकडून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांनी अक्षर सिग्नलचा वापर करावा.
2. नेरूळ पश्चिमेकडून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांनी वज्राणी स्पोर्ट्स सिग्नलमार्गे जावे.
3. बेलापूरकडून सीवुड्सकडे जाणाऱ्या वाहनांनी अक्षर सिग्नलचा वापर करावा.
4. बेलापूरकडून नेरूळ पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांनी वज्राणी स्पोर्ट्स सिग्नलमार्गे प्रवास करावा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai