पाण्याच्या टाक्यांमुळे किचन लॉफ्टला धोका
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 27, 2026
- 28
लॉफ्ट हलकेफुलके सामान ठेवण्यासाठी असल्याचा सिडकोचा दावा
नवी मुंबई : सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या गृहप्रकल्पातील सदनिकांच्या किचन लॉफ्टवर पाण्याच्या टाक्या ठेवणे धोकादायक असल्याचे सांगत त्या तातडीने काढण्याचे निर्देश सिडकोने दिले आहेत. मात्र, सिडकोच्या या पत्रामुळे इमारतींच्या बांधकाम क्षमतेबाबत आणि सुरक्षिततेबाबत भिती रहिवाशांच्या मनात निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध करून देणाऱ्या सिडकोच्या इमारतींमध्ये किचन लॉफ्टवर पाण्याच्या टाकीचे वजन पेलण्याची क्षमता नसेल, तर बांधकामाच्या दर्जाचे निकष नेमके काय होते, असा सवाल सदनिकाधारकांनी उपस्थित केला आहे.
सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 24 तास पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगत सदनिकांमध्ये पाण्याच्या साठवण टाकीसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही, परंतु सिडकोनिर्मित सदर घरांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने सदनिकाधारकांनी नाईलाजास्तव किचन लॉफ्ट आणि मोकळी जागा याचा वापर पाणी साठवण टाकी बसवण्यासाठी केला आहे. सिडकोचे कार्यकारी अभियंता गृहनिर्माण-1 व 2) के.बी.मालोदे यांनी 19 नोव्हेंबर 2026 रोजी घणसोली, तळोजा, खारघर, येथे उभारलेल्या गृहप्रकल्पातील सोसायट्यांना पाठविलेल्या पत्रात किचन लॉफ्टची रचना केवळ हलके साहित्य ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यावर पाण्याच्या टाक्या ठेवल्यास अतिरिक्त भारामुळे लॉफ्ट कोसळण्याची तसेच अपघात आणि जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भविष्यात अशा प्रकारामुळे दुर्घटना किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास सिडको प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बांधकामातील संभाव्य मर्यादा आणि सुरक्षेच्या प्रश्नांची जबाबदारी रहिवाशांवर ढकलून सिडको हात झटकत असल्याची टीका होऊ लागली आहे.
मुळात सदनिकांचे बांधकाम करताना सुरक्षिततेचे निकष आणि संरचनात्मक क्षमता यांची पुरेशी काळजी घेतली होती का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. बांधकामाच्या वेळीच अधिक भार पेलण्याच्या क्षमतेचे लॉफ्ट का बांधण्यात आले नाहीत हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नागरिकांनी लाखो रुपये खर्चून घरे घ्यायची आणि त्यानंतर बांधकामाच्या मर्यादांची जबाबदारी नागरिकांवरच टाकायची, हा प्रकार कितपत योग्य आहे? सिडकोने केवळ टाक्या काढण्याच्या सूचना देण्याऐवजी संबंधित इमारतींचे संरचनात्मक ऑडिट करून बांधकामाच्या दर्जाबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी आता पुढे येत आहे. तसेच सिडको आणि महापालिकेने नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा केल्यास साठवणुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी प्रतिक्रिया सदनिकाधारकांनी आजची नवी मुंबईशी बोलताना दिली.
- बांधकामातील बदलही रडारवर
काही सदनिकाधारक आणि दुकानदार मूळ बांधकामात अनधिकृत बदल करीत असल्याचेही सिडकोच्या निदर्शनास आले आहे. अशा बदलांमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या, अपघात अथवा मालमत्तेच्या नुकसानीस सिडको प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्याच्या टाक्या बसविणारे सदनिकाधारक तसेच बांधकामात बदल करणारे संबंधित सदनिकाधारक आणि गृहनिर्माण संस्था यांचीच जबाबदारी राहील, असेही सिडकोने बजावले आहे. संबंधितांनी या सूचनांची गंभीर दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश सिडकोने दिले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai