समान नागरी संहितेसाठी कोकणातील जनसुनावणी पूर्ण
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 36
नागरिकांची मते जाणून घेण्यावर भर ; 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अभिप्रायाची मुदत
नवी मुंबई : समान नागरी संहितेबाबत नागरिकांच्या भावना, सामाजिक वास्तव आणि विविध घटकांचे दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी आयोजित जनसुनावणीची कोकण विभागातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जनसुनावणीच्या दुसऱ्या दिवशी ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील नागरिकांशी समितीने संवाद साधला. यापूर्वी मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील नागरिकांची मते जाणून घेण्यात आली होती.
कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या जनसुनावणीत नागरिकांना कोणताही संकोच न बाळगता आपली मते आणि सूचना मांडण्याची संधी देण्यात आली. विवाहाचे कायदेशीर वय व नोंदणी, वैवाहिक हक्क आणि जबाबदाऱ्या, घटस्फोटाची प्रक्रिया, वारसा व उत्तराधिकार तसेच लिव्ह-इन रिलेशनशिपमधील व्यक्तींचे अधिकार आणि संरक्षण या चार प्रमुख विषयांवर समिती अभ्यास करीत आहे.समान नागरी संहितेचा विचार करताना देशातील धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक विविधतेचा आदर राखण्यासोबतच समानता, न्याय आणि कायदेशीर स्पष्टता साधण्याची भूमिका समितीने मांडली. नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना, अनुभव आणि सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून घेण्यावर समितीने भर दिला.
जनसुनावणी समितीमध्ये माजी न्यायमूर्ती संजय मेहरे, उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव शत्रुघ्न सिंह, माजी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, माजी महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, डॉ. सुवर्णा रावल, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, समितीच्या सचिव वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.दरम्यान, प्रत्यक्ष जनसुनावणीला उपस्थित राहता न येणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत दूरदृश्य प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाच्या अधिकृत समान नागरी कायदा पोर्टलवर 37 मुद्द्यांच्या आधारे ऑनलाइन अभिप्राय नोंदविता येणार आहे. नागरिकांना आपली मते, सूचना आणि अपेक्षा मांडण्यासाठी 15 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai