दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यातच खरा आनंद
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 39
पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचे तरुणाईला प्रेरणादायी आवाहन; प्रभात ट्रस्टचे स्मृतीव्याख्यान
नवी मुंबई : स्वतःपुरते जगण्यापेक्षा समाजातील वंचित घटकांच्या आणि मुक्या प्राण्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्यातच खरा आनंद आहे. दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यातच जीवनाचे सार्थक आहे, असे भावनिक आवाहन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी तरुणाईला केले.
प्रभात चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कै. प्रा. भास्करराव रंगराव थोरात यांच्या 14 व्या स्मृतीव्याख्यान, पुरस्कार वितरण व दीपमित्र सन्मान सोहळा 24 नोव्हेंबर रोजी वाशी येथील सिडको ऑडिटोरियममध्ये उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी आमटे दाम्पत्याचा हेमलकसा येथील संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडला. त्यांच्या सेवाभावी कार्याने उपस्थित विद्यार्थी आणि तरुणाई भारावून गेली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते ट्रस्टचे ‘दीपमित्र ते प्राणीमित्र’ अभियान. दिवाळीनंतर कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या ॲल्युमिनियमच्या टी-लाईट कपचे संकलन करून त्यावर पुनर्प्रक्रिया केली जात आहे. या ॲल्युमिनियमपासून भटके श्वान, मांजरी आणि पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची भांडी तयार करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. टाकाऊ दिव्यांचा वापर मुक्या प्राण्यांची भूक आणि तहान भागवण्यासाठी करण्याची ही संकल्पना विशेष कौतुकास पात्र ठरली.
यावेळी महापौर सुजाता पाटील, नवी मुंबईचे प्रथम महापौर तथा माजी खासदार संजीव नाईक आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवानी उपस्थित होते. त्यांनी ट्रस्टच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक केले. सोहळ्यात अवयवदान चळवळीतील योगदानाबद्दल नॅशनल बर्न सेंटर, ऐरोलीचे वैद्यकीय संचालक डॉ. सुनील केसवानी यांना ‘स्टार ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मरणोत्तर अवयवदान करणाऱ्या कै. साक्षी सोनावणे यांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे ग्रंथपाल डॉ. विश्वास हासे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत थोरात यांनी केले. यावेळी त्यांनी सौरऊर्जेवरील फिरते नेत्रचिकित्सा केंद्र, अवयवदान जनजागृती आणि दीपमित्र अभियानाची माहिती दिली. आभार प्रदर्शन प्रा. प्रताप महाडिक यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai