बांधकामातील धूळप्रदूषण रोखण्यासाठी विकासकांना दणका
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 35
नियमभंग केल्यास दंडात्मक कारवाई; 30 फूट उंच पत्रे, ग्रीन नेट, फॉगर मशीन आणि मॉनिटर बंधनकारक
नवी मुंबई : शहरातील वाढत्या बांधकामांमुळे होणारे धूळ व वायूप्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने विकासकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी वायू आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या मानक कार्यप्रणालीचे (एसओपी) उल्लंघन केल्यास विकासक आणि वास्तुविशारदांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार नगररचना विभागाचे सहायक संचालक सोमनाथ केकाण यांनी विकासक व बांधकाम परवानाधारकांची विशेष बैठक घेतली.
मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या जनहित याचिका क्रमांक 3/2023 मधील आदेश आणि उच्चस्तरीय समितीच्या (एचपीसी) निर्देशांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात येत आहे. बांधकामांमुळे होणाऱ्या धूळप्रदूषणासाठी संबंधित विकासक आणि वास्तुविशारदांना जबाबदार धरून एसओपीनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला. एसओपीनुसार प्रत्येक बांधकामाच्या भूखंडाभोवती 30 फूट उंच पत्रे आणि ग्रीन नेट लावणे, फॉगर मशीन व स्प्रिंकलर बसविणे, हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल एअर क्वालिटी इंडेक्स मॉनिटर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे. तसेच बांधकाम परिसरातील पदपथ आणि रस्ते स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, तळघराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे खोदकामाची कामे निर्धारित वेळेतच करण्याची सूचना विकासकांना करण्यात आली आहे. शहराचे पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य जपण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांचीही असल्याचे स्पष्ट करत महापालिकेने नियमांच्या अंमलबजावणीबाबत कठोर भूमिका घेतली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai