कोव्हीड टेस्टींगप्रमाणेच लसीकरणावर भर
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 23, 2021
- 594
दीड महिन्यात शून्य मृत्यूचे 29 दिवस ; मृत्यू दरात घट
नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांच्या प्रमाणात घट झालेली दिसत असली तरी जागतिक परिस्थिती पाहता तिसर्या लाटेचा धोका संपलेला नाही. महानगरपालिकेनेही दैनंदिन कोव्हीड टेस्टींगचे प्रमाण कमी होऊ दिलेले नाही. दररोज सरासरी 7 हजारहून अधिक नागरिकांची कोव्हीड टेस्टींग करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 22 लक्ष 23 हजार 569 इतक्या कोव्हीड टेस्ट करण्यात आलेल्या असून त्यामध्ये शासन निर्देशानुसार आरटी-पीसीआर टेस्ट 60 टक्के आणि अँन्टिजन टेस्ट 40 टक्के असे टेस्टचे प्रमाण कायम राखले आहे. तसेच मृत्यूदरातही घट झाली असून दीड महिन्यात 29 दिवस हे शून्य मृत्यूचे आहेत.
सद्यस्थितीत कोरोना रुग्ण आढळतो अशा इमारतीत, सोसायटी व वसाहतीत सर्वांचे टेस्टींग करण्यात येऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार टारगेटेड टेस्टींगवर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे प्रमाणही 30हून अधिक आहे. अशाप्रकारे रुग्णसाखळी खंडीत करण्यासाठी ट्रेसींग, टेस्टींग व ट्रिटमेंट अशा त्रिसूत्रीकडे बारकाईने लक्ष दिल्याने कोरोना बाधीतांची संख्या नियंत्रित होत असल्याचे दिसून येत आहे. उत्सवी कालावधीत कोरोना विषाणूचा प्रसार जास्त प्रमाणात होईल ही शक्यता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या सुट्टीच्या कालावधीतही कोव्हीड टेस्टींग सुरु ठेवण्यात आले होते. तसेच नागरिकांची लसीकरणाअभावी गैरसोय होऊ नये यादृष्टीने महापालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्रे कार्यान्वित ठेवण्यात आलेली होती. माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोरोना बाधीतांच्या संख्येत तसेच मृत्यू दरातही मोठ्या प्रमाणावर घट झालेली दिसत असून ऑक्टोबर महिन्याच्या 31 दिवसात 17 दिवस शून्य मृत्यूचे तसेच नोव्हेंबर महिन्याच्या 22 दिवसात 12 दिवस शून्य मृत्यूचे आहेत. अशाप्रकारे मागील दीड महिन्यात 29 दिवस शून्य मृत्यूचे आहेत. मागील 18,19,20,21 या नोव्हेंबर महिन्याच्या सलग 4 दिवसात एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे कोव्हीड मृत्यूदर 1.89 टक्के इतका कमी झालेला आहे.
मार्च 2020 पासून आत्तापर्यंत 1 लक्ष 9 हजार 163 इतक्या व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्या असून त्यामधील 1 लक्ष 6 हजार 895 नागरिकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली आहे. अशाप्रकारे कोरोनामधून बरे होणार्यांचे प्रमाण 97.92 टक्के इतके लक्षणीय आहे. सद्यस्थितीत उपचार सुरू असलेली कोरोना रूग्णसंख्याही 301 इतकी मर्यादीत आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण दुपटीचा कालावधी 3504 दिवस म्हणजेच साधारणत: 9.5 वर्षे इतका झालेला आहे. शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार 18 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महानगरपालिका असून यापैकी 7 लक्ष 17 हजार 824 म्हणजेच 64.84 टक्के नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. हर घर दस्तक अभियान अंतर्गत नागरिकांच्या घराजवळ जाऊन लसीकरण करण्यात येत असून 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात आत्तापर्यंत 206 सत्रांमध्ये 13 हजार 551 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय वाशी, नेरुळ व घणसोली या रेल्वे स्टेशन्सवर लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली असून आत्तापर्यंत 23 सत्रांमध्ये 2150 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai