‘माझी वसुंधरा अभियान’ मध्ये नवी मुंबई नंबर वन
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 07, 2022
- 743
10 कोटी रक्कमेचे प्रथम पारितोषिक
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने मागील वर्षीपासून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान’ 2021-22 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या प्रथम पुरस्काराची रू.10 कोटी रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान केली जाणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा पुरस्कार स्विकारला. मागील वर्षी ‘माझी वसुंधरा अभियाना’ मध्ये नवी मुंबई राज्यातील व्दितीय क्रमांकाचे मानांकित शहर ठरले होते. यावर्षी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून महानगरपालिका अभियानास सामोरी गेली आणि आपले गतवर्षीचे मानांकन एकने उंचावत राज्यातील सर्वोत्तम पर्यावरणपूरक शहराचे मानकरी ठरले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणशील शहर निर्मितीकरिता वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्षसंवर्धनाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. मागील 2 वर्षात दोन लाखांहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सेक्टर 14 कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानामध्ये मियावाकी पध्दतीने केलेल्या शहरी जंगल निर्मितीप्रमाणेच यावर्षी सेक्टर 28 नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथेही मियावाकी पध्दतीने 1 लक्ष 23 हजार देशी प्रजातीच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे. या सोबतच रस्त्याच्या कडेला 24 हरित क्षेत्रे विकसित करण्यात आली आहते. पालिका क्षेत्रात दैनंदिन निर्माण होणार्या 100 टक्के कचर्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जात असून कचर्याचे 3 प्रकारे वर्गीकरण व मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणार्या सोसायट्या, वसाहती, संस्था यांच्या ओल्या कचर्यावर निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणारे प्रकल्प राबविले जात आहेत. ‘टाकाऊपासून टिकाऊ 148 शिल्पाकृती निर्माण करून शहर सुशोभिकरणात लक्षणीय भर घालण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये याकरिता नागरिकांमध्ये विविध माध्यमांतून जनजागृती केली जात असून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमाही प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात आहे. ‘थ्री आर’ अर्थात कचर्याचा पुनर्वापर, कचरा निर्मितीत घट व कचर्यावर पुनर्प्रक्रिया या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात असून ‘ग्रीनसोल’ उपक्रमांतर्गत 1 लाखाहून जुने वापरात नसलेले बूट / चप्पल यांचे संकलन करून व त्यांचे नुतनीकरण करून गरजूंना वितरण करण्यात आले आहे. तलावांची नियमित स्वच्छता राखली जात आहे. त्याचप्रमाणे नाले स्वच्छ रहावेत यादृष्टीने नाल्यांच्या काठांवर उंच जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. वायू प्रदूषण रोखण्याकडेही विशेष लक्ष दिले जात असून हवेतील दूषित घटकांचे प्रमाण कमी करण्याप्रमाणेच हवा गुणवत्ता निरीक्षण करून त्यामध्ये सुधारणेसाठी आवश्यक उपायोजना राबविल्या जात आहेत. तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी अत्याधुनिक शास्त्रोक्त पध्दतीने बांधकाम व पाडकाम कचरा विल्हेवाट प्रकल्प राबविला जात आहे. 600 युलू सायकल आणि 180 ई बाईक्स प्रवासी सेवेत कार्यान्वित असून 35 कोटी ग्रॅम्सपेक्षा अधिक कार्बन फूटप्रिटंची बचत झालेली आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने फेम 2 अंतर्गत 20 ठिकाणी इलेक्ट्रिकल चार्जींग स्टेशन्स व त्यामध्ये 120 चार्जींग पॉईंट्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारंजे, उद्याने, बसडेपो आणि औद्योगिक वापरासाठी प्रक्रियाकृत सांडपाण्याचा वापर केला जात असून त्याव्दारे पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. एलईडी आणि सौर दिवे बसवून विजेचा वापर कमी केला जात आहे तसेच सरकारी इमारतींच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात येत आहेत तसेच ऊर्जा ऑटिड करण्यात येत आहे. नवी मुंबई ही स्वच्छतेप्रमाणेच निसर्गातील भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वांच्या संवर्धनासाठी जागरूकतेने काम करीत असून त्यामध्ये नवी मुंबईकर पर्यावरणप्रेमी नागरिकांचा नेहमीच सक्रीय सहभाग राहिला आहे. याचेच फलित म्हणजे माझी वसुंधरा अभियानात राज्यातील प्रथम क्रमांकाच्या शहराचा बहुमान असून पालिकेला मिळाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai