25 हजार नवी मुंबईकरांना सीपीआरचे धडे
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 28, 2026
- 39
फोर्टिस रुग्णालयाचा ‘हर घर हीरो’ उपक्रम; सोसायट्या, शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट कार्यालये आणि गणपती मंडळांमध्ये जनजागृती
नवी मुंबई : कार्डियाक अरेस्टच्या प्रसंगी वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंतची सुरुवातीची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात योग्य पद्धतीने सीपीआर दिल्यास रुग्णाचा जीव वाचविण्यास मदत होऊ शकते. याच उद्देशाने फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर हीरो’ उपक्रमातून आतापर्यंत नवी मुंबईतील तब्बल 25 हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत सीपीआर प्रशिक्षण आणि जनजागृती पोहोचविण्यात आली आहे.
रुग्णालयाच्या आवारापुरता मर्यादित न राहता हा उपक्रम निवासी सोसायट्या, शाळा-महाविद्यालये, कॉर्पोरेट कार्यालये तसेच गणपती मंडळांपर्यंत नेण्यात आला. कार्डियाक अरेस्टची लक्षणे ओळखणे, तातडीने वैद्यकीय मदत घेणे आणि बेसिक सीपीआर कसा करावा, याबाबत नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात विविध ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्याने या संधीचा उपयोग करून गणपती मंडळांमध्येही सीपीआर जनजागृती करण्यात आली. वाशीचा गणराज व नवी मुंबईचा राजा, जुईनगरचा राजा, फ्रेंड्स ग्रुप सेवा संस्था, श्री गणेश मित्र मंडळ व सार्वजनिक उत्कर्ष मित्र मंडळ, कोपरखैरणे, इच्छापूर्ती गणेश मंडळ, सानपाडा तसेच सोनारचा राजा यांसह विविध मंडळांमध्ये प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण घेण्यात आले.
निवासी सोसायट्यांमध्ये मोराज रेसिडेन्सी, पाम बीच रोड-सानपाडा, कलाश उद्यान सोसा., बालाजी गार्डन सोसा. कोपरखैरणे आणि हिमाचल सोसा.,वाशी येथेही प्रशिक्षण सत्रे घेण्यात आली. नवी मुंबई विद्यालय, एसआयईएस कॉलेज, टिळक कॉलेज आणि अंजुमन-ए-इस्लाम कॉलेजमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनाही सीपीआरचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. कार्डियाक अरेस्टची बहुतांश प्रकरणे रुग्णालयाबाहेर घडतात. अशा वेळी वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंतची मदत महत्त्वाची ठरते. भारतात रुग्णालयाबाहेरील कार्डियाक अरेस्टनंतर प्रत्यक्ष सीपीआर मिळण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने नागरिकांमध्ये प्राथमिक जीवनरक्षक कौशल्यांची जाणीव निर्माण करण्यावर ‘हर घर हीरो’ उपक्रमातून भर देण्यात येत आहे.
फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशीचे फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. आशुतोष पांडे म्हणाले, “कार्डियाक अरेस्टची आपत्कालीन परिस्थिती कुठेही उद्भवू शकते. तातडीने दिल्यास जगण्याची शक्यता वाढण्यास मदत होऊ शकते. ‘हर घर हीरो’ च्या माध्यमातून सीपीआरचे ज्ञान थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी संकोच न करता योग्य पहिली पावले उचलावीत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.’ दरम्यान, गणेशोत्सवानंतरही हा उपक्रम सुरू राहणार असून ऑक्टोबर 2026 मध्ये दर रविवारी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथे सीपीआर प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागीांना सीपीआर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai