इवल्याश्या गतिरोधकांना वाहनांचा वेग आवरेना
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 03, 2022
- 608
विजय आहिरे
बेदरकार वाहनचालकांचा सूसाट प्रवास ; उंची वाढविण्याची नागरिकांची मागणी
नवी मुंबई : वाशी-कोपखैरणे या सतत वर्दळीच्या असलेल्या मार्गावर वाहनांचा वेग मर्यादित रहावा तसेच नागरिकांना सहज रस्ता ओलांडता यावा याकरिता अनके ठिकाणी छोटे गतीरोधक तसेच रम्बलर्स बसविण्यात आले आहेत. परंतु, बेदरकार वाहनचालक त्याला जुमानत नसल्याने या ठिकाणी नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे या गतिरोधकांची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील जास्त वर्दळीचा भाग म्हणून वाशी-कोपखैरणे मार्ग ओळखला जातो. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तसेच पादचारी नागरीकांचीही गर्दी असते. गर्दीच्या वेळेत या मार्गावरील अनेक ठिकाणी वाहतूककोंडी नित्याचीच बाब झाली आहे. अवैध पार्किंग आणि फेरीवाल्यांचा विळख्याने या मार्गाला ग्रासले असल्यामुळे दुकानदार व नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच गतीरोधकांना न जुमानणारी वाहतूक हाही एक चिंतेचा विषय बनू पाहत आहे. वाहनांचा वेगावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच नागरीकांना सहज रस्ता ओलांडता यावा याकरिता या मार्गावर अनेक ठिकाणी रम्ब्लर्स व गतीरोधक बसविण्यात आले आहेत. परंतु, अनेक वाहनचालक वेग कमी न करता वेगाने गतीरोधकांवरून गाडी दामटत आहेत. काही बस चालक व रिक्षा चालक वेग कमी न करता जोरजोरात हॉर्न वाजवत गाडी रेटत असतात. काहीजण गतीरोधक टाळण्यासाठी बाजूला असलेल्या पेव्हर ब्लॉकवरून गाडी पळवतात. या सर्व प्रकारामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. या बेदरकार वाहनचालकांवर कुणाचेही बंधन नसल्याने गतिरोधकांची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गतिरोधकांची उंची तसेच त्याची जागा ठरवणे महापालिकेच्या अखत्यारीतील विषय आहे. आम्ही एनओसी देतो.- बापू देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाशी, वाहतूक विभाग
गतीरोधकांची उंची नियमाप्रमाणे आहे. आवश्यक असल्यास अथवा वाहतूक विभागाकडून सूचना अथवा तसा प्रस्ताव आल्यास कार्यवाही करू. - संजय देसाई, शहर अभियंता, न. मु. म.पा.
या मार्गावर सततची वर्दळ असते. बस, रिक्षा वेगात असतात. त्यांच्याकडून नियमांचे पालन केले जात नाही. गतीरोधकांवरून जाताना सुध्दा वाहनांचा वेग कमी केला जात नसल्याने रस्ता ओलांडताना नागरिकांची तारांबळ उडत आहे. गतीरोधकांची उंची वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच महापालिका व वाहतूक विभागाला निवेदन देणार आहे. - सुरेश तुकाराम शिंदे, समाजसेवक, वाशी
रस्ता ओलांडणार्या नागरिकांची संख्या या मार्गावर जास्त आहे. गतिरोधकांची उंची जास्त असणे गरजेचे आहे. बेफाम वाहन चालकांमुळे अनेकदा या ठिकाणी पूर्वी अपघात झाले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांची या मार्गावर गरज आहे. - विजय वाळुंज, समाजसेवक, वाशी
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai