इआरपी नवी प्रणाली जलद कार्यान्वित करा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2023
- 476
आयुक्त राजेश नार्वेकर यांचे निर्देश
नवी मुंबई ः महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये परस्पर समन्वय राहावा व नागरिकांना महापालिकेशी संबंधित सेवा विहित कालावधीत, कमीत कमी श्रमात सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने नवीन इआरपी (इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) प्रणाली कार्यान्वित करण्याची कार्यवाही जलद पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी अधिक काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले. विविध विभागांतील कामांचा आढावा घेताना त्यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत इआरपी प्रणालीच्या सदयस्थितीचा सविस्तर आढावा घेतला व विभागांचा प्राधान्यक्रम ठरवून काम पूर्ण होईल तसतशा त्या त्या विभागांच्या सेवा कार्यान्वित कराव्यात असे निर्देश दिले.
या बैठकीप्रसंगी इआरपी प्रणालीत उपलब्ध सुविधांची आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बारकाईने पाहणी केली व काही सेवा उपलब्धतेची कार्यवाही जाणून घेतली. सध्याची कार्यान्वित इआरपी प्रणाली अदययावत केली जात असून यामुळे मुख्यालय व विभाग कार्यालयांसह इतर विभाग यांच्याकरीता एकच सॉफ्टवेअर वापरले जाईल आणि सर्व विभागांच्या कामकाजात एकसूत्रता येईल. महापालिका प्रशासन आणि नागरिक या दोघांच्या दृष्टीने इआरपीची ही नवी प्रणाली लाभदायक असून नवी मुंबई महानगरपालिकेने डिजीटायलेझेशनच्या दिशेने टाकलेले हे पुढचे पाऊल आहे. या सोबतच लिडार सर्वेक्षणाचा आढावा घेताना आयुक्तांनी मालमत्ताकर विभागाने सर्वेक्षणाव्दारे उपलब्ध माहितीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही तत्परतेने सुरु करावी असे निर्देशित केले. स्वच्छता ही नवी मुंबईची ओळख असून यामध्ये अधिकाधिक सुधारणा करत राहणे हे आपले उद्दीष्ट आहे. स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान या अनुषंगाने विभागनिहाय नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांपासून प्रत्येक घटकाने आपापली कामे सतर्कतेने करावयाची असून शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी सर्वोतोपरी योगदान द्यावयाचे आहे. यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही व जबाबदारी निश्चित केली जाईल असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला.
उदयानांचे शहर ही देखील नवी मुंबईची एक वेगळी ओळख असून उदयानांची स्थिती सुधारण्यावर भर द्यावा तसेच खेळणी दुरूस्तीसोबतच टॉय ट्रेन सुरू करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. उदयानांच्या अधिक चांगल्या विकासासाठी आवश्यक बाबींची उद्याननिहाय विभागवार सूची करण्याचे निर्देश आयुक्तांनी यापूर्वीच दिले होते त्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक घेण्यात येईल हे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र वापराचे धोरण लवकरात लवकर अंतिम करावे तसेच से-15 बेलापूर पार्कींग इमारत, ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र सीवूड्स, से-9 वाशी बसडेपो, वाशी अग्निशमन केंद्र, स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन, पशुवैदयकिय रुग्णालय येथील सुविधा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करावी असेही निर्देश आयुक्तांनी आढावा घेताना दिले. घणसोली सेंट्रल पार्क येथील तरण तलावाचे काम जलद गतीने पूर्ण करावे तसेच ठिकठिकाणच्या मार्केट गाळयांचे वितरणही नोंदणीकृत फेरीवाल्यांना सूचना देऊन लॉटरी पध्दतीने कालबध्द नियोजन करुन जलद पूर्ण करावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले. विकसीत भारत संकल्प यात्रेचे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठीचे वेळापत्रक येणार असल्याचे गृहीत धरुन नमुंमपा क्षेत्रातील विभागनिहाय जागा निवडून ठेवाव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांना अपेक्षित गतीमान व दर्जेदार सेवासुविधापूर्तीकरिता काम करणे अपेक्षित असून त्यादृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे सहकार्य घेऊन नियोजनबध्द काम करण्याचे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai