दक्षता विभागच ‘अतिदक्षता’ विभागात
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 12, 2025
- 296
दोन महिन्यात सिडकोचे 10 ते 12 अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
नवी मुंबई : सिडकोतील भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सिडकोमध्ये दक्षता विभाग सुरु केला. सिडकोने दक्षता अधिकारी म्हणून इन्स्पेक्टर जनरलपासून पोलीस उपमहानिरिक्षक दर्जाचे अधिकारी नेमूनही सिडकोतील भ्रष्टाचार रोखण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. गेल्या दोन महिन्यात 10 ते 12 अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने भ्रष्टाचार रोखण्यासाठी नेमलेला दक्षता विभागच अतिदक्षता विभागात गेल्याचे बोलले जात आहे.
सिडको आणि भ्रष्टाचार यांचे अतिशय जवळचे नाते असून सिडकोतील भ्रष्टाचार उघडकीस यावा म्हणून शासनाने आतापर्यंत अनेक समित्या नेमल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे नंदलाल समिती, उच्च न्यायालयाच्या आदेशाने एस.एस.तिनईकर समिती, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. डी.के.शंकरन समिती तसेच डॉ. बेंजामिन समिती व मागो समिती यांचा समावेश आहे. या समित्यांनी दिलेल्या अहवालामुळे सिडकोचे शेकडो कोटींचे नुकसान वाचले असून अनेक अधिकाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. सिडकोच्या शहरसेवा व साडे बारा टक्के भूखंड वाटपात कमालीचा भ्रष्टाचार असल्याचे बोलले जाते.
सिडकोतील भ्रष्टाचार कमी व्हावा व कामात पारदर्शकता यावी म्हणून 2016 साली तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सिडकोमध्ये दक्षता विभाग सुरु केला. या विभागात पोलीस खात्यातून इन्स्पेक्टर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणुक केली. सध्या पोलीस उपमहानिरिक्षक सुरेश मेंगडे हे या पदाचा कारभार सांभाळत असून त्यांच्या कार्यकाळात अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पर्दाफाश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. सर्वसाधारण नागरिकांच्या तक्रारीची योग्य ती दखल दक्षता विभागाकडून घेतली जात नसल्याने नागरिकांनी त्यांचा मोर्चा आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वळवला आहे. त्याची फलश्रुती म्हणून अनेक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने दक्षता विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांनी केलेली तक्रार ही पुन्हा त्याच विभागाकडे अहवाल मागवण्यासाठी पाठवण्याची कारवाई करण्यात येऊन आलेला अहवाल व्यवस्थापकीय संचालकांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येतो. त्यामुळे दक्षता विभाग असूनही तो नसल्यासारखाच असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत असून दक्षता विभाग प्रमुखांना त्यांच्या मुळ जागेवर परत पाठवून गुन्हेगारांना पकडण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. दक्षता विभागावर सिडको सध्या वार्षिक कोट्यवधी रुपये खर्च करत असून हा विभागच अतिदक्षता विभागात गेल्याने लवकरतात लवकर गुंडाळण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai