आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्पाला गती
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 14, 2025
- 212
रस्ते बांधणीसाठी 116 कोटींची निविदा
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या पाच किलोमीटरवर सिडको आपला महत्त्वाकांक्षी 100 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्प प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. एकात्मिक आरोग्यविषयक व शैक्षणिक सुविधा, आंतरराष्ट्रीय मानकांचे क्रीडा संकुल व कौशल्य केंद्र उभारण्याच्या प्रमुख उद्देशाने उत्कृष्टता केंद्र हा प्रकल्प सिडकोतर्फे विकसित करण्यात येत आहे. महामंडळाने या प्रकल्पासाठी 85% जमीन ताब्यात घेतली आहे आणि विमानतळाजवळील भूखंड तातडीच्या विकासासाठी मोकळे केले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ‘4 ब’ वरून या प्रकल्पापर्यंत पोहचण्यासाठी पोहोच रस्ते बांधणीच्या कामासाठी 116 कोटी रुपयांची निविदा नुकतीच सिडकोने जाहीर केली.
जागतिक स्तरावरील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिमत्ता आकर्षित करणारे जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र नवी मुंबईत उभे राहत आहे. सिडको महामंडळाने या प्रकल्पासाठी सुमारे 100 हेक्टर क्षेत्र राखीव ठेवले आहे तसेच या 85 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण केले आहे. या परिसरातील दगड काढून लहान टेकड्यांचे सपाटीकरण करणे हे मुख्य अभियांत्रिकी आव्हान आहे. या प्रकल्पाच्या प्रवेश रस्त्यासाठी नुकतेच 116.53 कोटी रुपयांचे महत्त्वपूर्ण कंत्राट 1.1 किलोमीटर लांबीच्या, 30 ते 45 मीटर रुंदीच्या प्रवेश रस्त्याच्या बांधकामासाठी काढले आहे. सपाटीकरण, तयारीची कामे आणि संपूर्ण प्रकल्पाच्या विकासासाठी सिडको 890 कोटी रुपयांचा निधी निश्चित केला आहे. हा रस्ता कुंडेवहाळ गावाजवळून सुरू होईल आणि एज्युसिटी साइटला थेट राष्ट्रीय महामार्ग 4 बी (पनवेल-उरण-जेएनपीटी महामार्ग) शी जोडला जाणार आहे. या अप्रोच रोडच्या कामाची निविदा जमा करण्याची अंतिम तारीख 4 डिसेंबर 2025 आहे. इतर निविदा कुंडेवहाळ येथील सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत आंतरराष्ट्रीय एज्युसिटीच्या भूखंडाचा विकास या दोन भागांसाठी समांतर निविदा काढल्या आहेत, ज्यांची बोली सादर करण्याची अंतिम मुदत 2 डिसेंबर 2025 आहे.
या टाऊनशिपमध्ये विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रम देणाऱ्या विद्यापीठांचा आणि महाविद्यालयांचा समावेश असेल. जागतिक मानके शैक्षणिक मॉडेल आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रत्येक विद्यापीठाला 10 हेक्टर जमीन आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 30 चौरस मीटर जागा निश्चित केली आहे. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्राला जागतिक शैक्षणिक केंद्र बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.
आंतरराष्ट्रीय भागीदार
14 जून 2025 रोजी सिडको, महाराष्ट्र शासन आणि यॉर्क विद्यापीठ, ॲबरडीन विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉइस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आयईडी विद्यापीठ या पाच नामांकित परदेशी विद्यापीठांदरम्यान सामंजस्य करारनामा करण्यात येऊन नवी मुंबईमध्ये कॅम्पस स्थापन करण्याकरिता या विद्यापीठांना इरादापत्रे प्रदान करण्यात आली. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना देशाबाहेर न जाता थेट आंतरराष्ट्रीय पदवी मिळवता येईल, ज्याचा खर्च परदेशात शिक्षण घेण्याच्या तुलनेत 25% ते 30% कमी असेल.
आंतरराष्ट्रीय एज्युसिटी हा देशामध्ये शैक्षणिक क्रांती घडवणारा प्रकल्प असून याद्वारे देशातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी विद्यापीठे व नामांकित शिक्षणतज्ज्ञांकडून शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे ज्ञानी समाजाची निर्मिती, बहुसांस्कृतिक आदानप्रदान आणि संशोधन यांना चालना मिळणार आहे. नियोजित वेळेत एज्युसिटी प्रकल्प पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. आंतरराष्ट्रीय एज्युसिटी एक ऐतिहासिक उपक्रम असून ज्यामध्ये एकाच ठिकाणी एकाच कॅम्पसमध्ये 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सामील असतील -- हा देशातील अशा प्रकारचा एकमेव उपक्रम ठरेल. विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai