नवी मुंबईत राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
- by Aajchi Navi Mumbai
- May 08, 2026
- 30
9 आणि 10 मे रोजी रंगणार स्पर्धा बॅडमिंटन सुपर लीग
नवी मुंबई ः महाराष्ट्रातील बॅडमिंटन खेळाला आता एक नवे आणि व्यावसायिक वळण मिळणार आहे. राज्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेल्या फ्रँचायझी-आधारित फिनिक्स बॅडमिंटन सुपर लीग-2026 ची घोषणा नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनने केली आहे. ही बहुप्रतिक्षित स्पर्धा येत्या 9 आणि 10 मे रोजी वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन येथे खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेची अधिकृत सुरुवात करण्यापूर्वी नुकताच सर्व फ्रँचायझी मालक आणि महत्त्वाच्या भागधारकांचा एक मेळावा (ओनर्स मीट अँड ग्रीट) पार पडला. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव आधीच यशस्वीरीत्या पार पडला असून, संपूर्ण महाराष्ट्रातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंना विविध फ्रँचायझींनी आपल्या संघात सामील करून घेतले आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या जाणाऱ्या या लीगला विविध कॉर्पोरेट कंपन्यांनी मोठे पाठबळ दिले आहे. राज्य पातळीवरील बॅडमिंटनमध्ये अशा प्रकारे कॉर्पोरेट जगताने थेट गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या लीगमध्ये मेट्रो ग्रुप, सत्यम डेव्हलपर्स आणि प्रियांका रीजन्सी या रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपन्यांसह प्रसिद्ध स्टेशनरी ब्रँड डॉम्स ने संघ खरेदी केले आहेत. तसेच संरक्षण क्षेत्रातील क्रास्नी डिफेन्स आणि एनडीटी टेक्नॉलॉजीज यांनीही संघ मालक म्हणून यात गुंतवणूक केली आहे. भारतातील आघाडीची क्रेन भाड्याने देणारी संस्था फिनिक्स इन्फ्राकॉन सोल्युशन्स या लीगची मुख्य प्रायोजक (टायटल स्पॉन्सर) आहे, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक आणि माजी विजेते बॅडमिंटनपटू श्रीशैल मितकरी यांनी दिली. या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात या पातळीवर आयोजित होणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धांमध्ये ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम मानली जात आहे. गेल्या वर्षी वाशीच्या याच मैदानावर पार पडलेली बॅडमिंटन सुपर लीगची पहिली आवृत्ती कमालीची यशस्वी ठरली होती आणि तिने राज्यातील क्रीडा क्षेत्रात मोठी छाप पाडली होती. त्या पहिल्या हंगामात 10 फ्रँचायझी संघांमधील 80 प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तसेच 500 हून अधिक प्रत्यक्ष प्रेक्षकांनी स्टेडियमवर येऊन आणि 10 हजारांपेक्षा जास्त ऑनलाईन चाहत्यांनी या स्पर्धेचा थरार अनुभवला होता. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा त्याहूनही अधिक भव्य आणि चुरशीची होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
- स्टार खेळाडूंचा सहभाग
या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये टॉप रँकिंग असलेल्या स्टार खेळाडूंचा परफॉर्मन्स पाहता येणार आहे. विप्लव कुवळे, सिमरन सिंधी, विराज कुवळे, दीप रंभिया आणि सोनाली मिरखेलकर हे या स्पर्धेचे आकर्षण आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai