मतदार पुनरीक्षण मोहिमेत उदासीनता; निम्मीच गणनापत्रे जमा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2026
- 23
8 ऑगस्टपूर्वी गणनापत्र न भरल्यास नाव वगळण्याची शक्यता
नवी मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला मुदतवाढ देण्यात आल्याने आता ही प्रक्रिया 17 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी रविवारी बेलापूर व ऐरोली विधानसभा मतदारसंघांतील कामाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर एसआयआर मोहिमेला वेग आला आहे. नागरिकांनी मतदारयादीत नाव कायम ठेवण्यासाठी विहित मुदतीत आपली गणनापत्रे संबंधित बीएलओंकडे जमा करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
स्वतंत्र आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कामाचा अधिकारीनिहाय आढावा घेतला. ज्या अधिकाऱ्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्यांच्याकडून कारणे जाणून घेत उर्वरित कालावधीत बीएलओनिहाय सूक्ष्म नियोजन (मायक्रोप्लॅनिंग) करून निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
- ऐरोली मतदारसंघात अर्ध्याहून कमी गणनापत्रे जमा
150 ऐरोली विधानसभा मतदारसंघात 4,97,380 मतदारांपैकी 4,59,153 गणनाप्रपत्रांचे वितरण झालेले असून 2,23,808 गणनाप्रपत्रे मतदारांकडून बीएलओंकडे माहिती भरून जमा करण्यात आलेली आहेत व त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झालेले आहे. त्याचप्रमाणे, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील 4,22,317 मतदारांपैकी 4,10,863 गणनाप्रपत्रांचे वितरण झालेले असून 2,18,028 गणनाप्रपत्रे मतदारांकडून बीएलओंकडे आवश्यक माहिती भरून जमा झालेली आहेत व त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झालेले आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये गणनापत्रांचे वितरण मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी प्रत्यक्ष भरून जमा झालेल्या गणनापत्रांची संख्या सुमारे निम्म्याच्या आसपास असल्याने प्रशासनाने उर्वरित मतदारांनी तातडीने प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, 8 ऑगस्टपर्यंत गणनापत्र भरून जमा न केल्यास संबंधित मतदाराचे नाव प्रारूप मतदारयादीतून वगळले जाऊ शकते. त्यानंतर मतदारयादीत नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक 6 आणि आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. सन 2002 च्या मतदारयादीत स्वतःचे किंवा पालकांचे नाव सापडले नाही, तरीही नागरिकांनी गणनापत्रातील कॉलम क्रमांक 3 मध्ये सध्याची माहिती भरून स्वाक्षरीसह ते संबंधित बीएलओंकडे जमा करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बैठकीत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बीएलओंच्या कामावर प्रभावी नियंत्रण ठेवावे, तसेच उर्वरित काही दिवसांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि समाजातील मान्यवर व्यक्तींचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी दिल्या. - सुधारित वेळापत्रक
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 30 जूनपासून सुरू असून त्या अंतर्गत गणनाअर्ज दाखल करण्याची मुदत 8 ऑगस्टपर्यंत होती. त्यास भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन 24 ऑगस्ट 2026 पर्यंत करावयाचे असून याबाबत दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 असणार आहे तसेच तसेच प्राप्त दावे व हरकतींची नोटीस प्रक्रिया आणि निकाली काढणे कालावधी 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026 हा असणार आहे. अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai