महिला व बालकल्याण योजनांना मिळणार नवी दिशा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 56
आढावा बैठकीत महिला सक्षमीकरण, मातृ-शिशु आरोग्य आणि बालकल्याणावर भर
पनवेल : पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी 10 ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महिला व बालकांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
महिलांचे आरोग्य आणि मातृ-शिशु आरोग्य संवर्धन योजना अधिक प्रभावीपणे राबविणे, गरजू मातांना व नवजात बालकांना सर्वसमावेशक व विनामूल्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, तसेच महापालिका क्षेत्रात हिरकणी कक्ष उभारण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याची वार्षिक रक्कम वाढविण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. याशिवाय अनाथ बाल शिक्षण शिष्यवृत्ती, अनाथ बाल शिक्षण प्रवेश सहाय्य, एकल स्त्री पाल्य शिक्षण शिष्यवृत्ती, एकल स्त्री पाल्य शिक्षण प्रवेश सहाय्य आणि एकल स्त्री स्वावलंबन सन्मान योजना यांचा आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनांचा अधिकाधिक लाभ पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मोदक व पुरणपोळी महोत्सव-2026’ आयोजित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच श्रावण महिन्यानिमित्त 18 ऑगस्ट 2026 रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘श्रावण महोत्सव-2026’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनाचाही आढावा घेण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ पात्र महिला, बालके आणि गरजू कुटुंबांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विभागीय पातळीवर आवश्यक कार्यवाही करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांनी मार्गदर्शन केले.बैठकीस महिला व बालकल्याण समितीच्या सर्व सदस्या, उपायुक्त मंगला माळवे, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, विभागप्रमुख कविता मोकल, डेएनयुएलएम व्यवस्थापक विनया म्हात्रे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai