पनवेलमध्ये आरोग्यसेवा बळकटीकरणावर भर
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 55
‘पनवेल महानगरपालिका मॉडेल’ विकसित करण्याच्या आ.ठाकूर यांच्या सूचना
पनवेल : पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा 10 ऑगस्ट रोजी महानगरपालिका मुख्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नागरिकांना अधिक गतिमान, दर्जेदार आणि लोकाभिमुख आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका क्षेत्रातील विविध आरोग्य सेवांचा आढावा घेत आभा कार्ड, आयुष्मान भारत कार्ड आणि वयोवंदन योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या. आदिवासी वाड्या तसेच झोपडपट्टी परिसरात विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आभा आणि आयुष्मान भारत कार्ड काढताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधा आणि सेवांची माहिती देणारे फलक लावावेत व नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करताना आरोग्य सेवांच्या दर्जात गुणात्मक आणि परिणामकारक सुधारणा करण्याच्या सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी वैद्यकीय आरोग्य विभागाला दिल्या.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, यासाठी खासगी रुग्णालयांना या योजनांशी जोडण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याबाबतही चर्चा झाली. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक डॉ. जगन्नाथ वीरकर यांनी पनवेल महापालिकेने संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल असे ‘पनवेल महानगरपालिका मॉडेल’ विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन आरोग्य केंद्रांची गरज असून, त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, महापालिका सदस्य, उपायुक्त अभिषेक पराडकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक शिवाजी पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त संचालक डॉ. जगन्नाथ वीरकर, सहाय्यक संचालक डॉ. दीप्ती देशमुख तसेच काही सदस्य ऑनलाइन सहभागी झाले. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध आरोग्य सेवा व उपक्रमांची माहिती डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. नागरिकांचा आणि समुदायाचा आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सभेचा समारोप एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या सचिव तथा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai