‘श्रावण महोत्सव’ उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 25
पनवेल ः महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रथमच आयोजित ‘श्रावण महोत्सव 2026’ आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. सभागृह महिलांच्या मोठ्या उपस्थितीने भरून गेले होते.
महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर प्रमिला पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त मेघमाळे, प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष अजय बहिरा, प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष मधु पाटील, तसेच महानपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
या महोत्सवात बौद्धिक दिव्यांग मुलांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचे विक्री केंद्र उभारण्यात आले होते. या विशेष मुलांच्या कलागुणांना आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित महिलांनी राख्या खरेदी करून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रीतम म्हात्रे यांनी केले. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा अनोखा फॅशन शो महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरला. अबोली संघटनेच्या महिला रिक्षाचालक, एकल महिला, स्वच्छता दूत कर्मचारी, आशा सेविका, दिव्यांग महिला, विशेष मुले, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत महानगरपालिकेच्या नगरसेविकांनीही हॅण्डलूमच्या साड्या परिधान करून फॅशन शोमध्ये सहभाग घेतला.
स्थानिक कलाकार आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी नृत्य, मंगळागौर, कोळी नृत्य, लावणी यांसह विविध कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष मुलांनी सादर केलेला परफॉर्मन्स आणि गणेश वंदना हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. या सादरीकरणांना उपस्थित महिलांनी भरभरून दाद दिली.महिला सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शी-पोर्टल या ऑनलाइन पोर्टलची माहितीही कार्यक्रमात महिलांना देण्यात आली. कार्यस्थळी लैंगिक छळ किंवा संबंधित स्वरूपाची समस्या उद्भवल्यास महिला या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात. संबंधित यंत्रणेमार्फत तक्रारीवर कार्यवाही व तक्रार निवारणाची प्रक्रिया कशी केली जाते, याबाबत उपस्थित महिलांना माहिती देण्यात आली. समाजातील प्रत्येक स्तरातील महिलांसोबत निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधी खांद्याला खांदा लावून काम करू शकतात आणि त्यांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व सक्षमपणे करू शकतात, हा महिला सक्षमीकरणाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या श्रावण महात्सवमध्ये मनोरंजनासोबत महिला सुरक्षा, सामाजिक समावेशकता, विशेष मुलांना प्रोत्साहन, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक कलागुणांना व्यासपीठ अशा विविध विषयांची सांगड घालण्यात आली.
या महोत्सवाला पनवेल नगर परिषदेच्या काळात काम केलेल्या माजी ज्येष्ठ महिला नगरसेविका विशेषत्वाने उपस्थित होत्या. महिला व बालकल्याण समितीच्या सर्व सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. महिला सक्षमीकरण, महिलांची सुरक्षा, रोजगार, आरोग्य आणि विविध सामाजिक प्रश्नांसाठी सर्व महिला नगरसेविका एकत्रितपणे काम करण्यास सक्षम असल्याचा सकारात्मक संदेश यानिमित्ताने पनवेलकरांना देण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai