पामबीच मार्गावरील चार ‘ब्लॅक स्पॉट’वर नऊ उपाययोजना
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2026
- 29
वेग नियंत्रणासाठी एआय कॅमेरे, रंबलरची उंची वाढविण्याची सूचना; महापालिकेला वाहतूक पोलिसांचा कृती आराखडा
नवी मुंबई : पामबीच मार्गावर निर्धारित ताशी 60 किलोमीटर वेगमर्यादा असतानाही वाहनांचा वेग नियंत्रित करण्याचे आव्हान कायम आहे. रस्त्याची रचना आणि वाहनांना मिळणारा मोकळा मार्ग यामुळे अनेकदा वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. वाढते अपघात लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पामबीच मार्गावरील चार अपघातप्रवण ठिकाणे ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित केली असून, या ठिकाणी तसेच संपूर्ण मार्गावर वेग नियंत्रणासाठी नऊ उपाययोजनांचा कृती आराखडा नवी मुंबई महापालिकेला सुचविला आहे.
पामबीच मार्गावरील अपघातांचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून कायम आहे. 2023 मध्ये या मार्गावर 12, तर 2024 मध्ये 10 अपघात झाले होते. 2025 मध्ये नोव्हेंबरपर्यंत चार अपघातांची नोंद झाली होती. त्यानंतरही अपघातांची मालिका सुरूच राहिल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे. वाहतूक पोलिसांनी अक्षर सिग्नल, टी. एस. चाणक्य सिग्नल, सारसोळे सिग्नल आणि मोराज सिग्नल ही चार ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित केली आहेत. या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी यापूर्वीही महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र अपेक्षित कार्यवाही वेळेत न झाल्याचे वाहतूक पोलिसांनी महापालिकेला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सध्या पामबीच मार्गावर असलेले रंबलर 12.5 मिलिमीटर उंचीचे असून त्यांच्यात 30 ते 40 मीटरचे अंतर आहे. त्यामुळे वाहनांचा वेग अपेक्षित प्रमाणात कमी होत नसल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. त्यामुळे रंबलरची उंची 20 मिलिमीटरपर्यंत वाढवून, 15 मीटर अंतराच्या तीन ते चार टप्प्यांत ते बसविण्याची सूचना करण्यात आली आहे. मोराज सिग्नलजवळ अक्षर टॉवरसमोरील वाशी-बेलापूर मार्गिकेवर नव्याने रंबलर बसविण्याचाही प्रस्ताव आहे. रात्रीच्या वेळी ते स्पष्ट दिसावेत यासाठी ब्लिंकर आणि कॅट-आयज बसविण्याची शिफारस करण्यात आली आहे.
- एआय कॅमेऱ्यांची नजर
वाहनांच्या वेगावर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी पामबीच मार्गावरील चार ते पाच ठिकाणी एआय आधारित वेगमापन कॅमेरे बसविण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच दर 500 मीटरवर वेगमर्यादेचे फलक लावण्याचा प्रस्ताव आहे.याशिवाय संपूर्ण पामबीच मार्गावरील जुने पथदिवे बदलून एलईडी दिवे बसविणे, दुचाकीस्वारांनी डाव्या मार्गिकेतूनच प्रवास करावा यासाठी दिशादर्शक फलक लावणे, रस्त्याच्या कडेचा भाग उंच करून रस्त्याच्या पातळीशी समांतर करणे आणि दुभाजक व लोखंडी कठड्यांवर परावर्तित होणारे रेडियम स्टिकर्स लावण्याचाही कृती आराखड्यात समावेश आहे.अनधिकृत जोडरस्ता बंद करण्याची सूचनामोराज सिग्नलजवळ अक्षर टॉवरच्या बाजूने लोखंडी कठडा तोडून मुख्य मार्गिकेला जोडण्यात आलेला अनधिकृत जोडरस्ता कायमस्वरूपी बंद करण्याची सूचनाही वाहतूक पोलिसांनी केली आहे. या सर्व उपाययोजनांचा मुख्य उद्देश वाहनांचा प्रत्यक्ष वेग कमी करणे आणि रात्रीच्या वेळी रस्त्याची दृश्यमानता वाढविणे हा आहे. - ‘अपघात शून्यावर आणण्याचे लक्ष्य’
पामबीचवरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या उपाययोजना महापालिकेला सुचविण्यात आल्या आहेत. वाहनांचा वेग नियंत्रित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. वाहतूक पोलिसांकडून यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, भविष्यात या मार्गावरील अपघात शून्यावर आणण्याचे आमचे लक्ष्य आहे.- डॉ. राहुल खाडे, उपायुक्त
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai