विनयभंग करणारा डॉक्टर निलंबित
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 27
नवी मुंबई : महिला रुग्णाचा विनयभंग केल्याप्रकरणी तुर्भे येथील श्री रामतनु माता बाल रुग्णालयातील कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ बोरसे यांना अखेर महापालिका प्रशासनाने सोमवारी निलंबित केले. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी यापूर्वीच त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तुर्भे परिसरात राहणारी 42 वर्षीय महिला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तुर्भे येथील श्री रामतनु माता बाल रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. यावेळी ती तपासणीसाठी कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ बोरसे यांच्याकडे गेली असता, डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी करण्याऐवजी तिचा हात पकडून पाच हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले आणि शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने रुग्णालयातून बाहेर पडून थेट एपीएमसी पोलीस ठाणे गाठले आणि डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका कविता पाटील यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन संबंधित डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. महिला रुग्णासोबत घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने अखेर सोमवारी डॉ. बोरसे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी निलंबनाच्या कारवाईला दुजोरा दिला. संबंधित डॉक्टरांविरोधात यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या अनेक अंतर्गत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीत समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील प्रशासकीय कारवाई निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही संबंधित डॉक्टरांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती समोर आल्याने, त्या तक्रारींचे स्वरूप आणि त्यावर प्रशासनाने केलेली कार्यवाही याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पोलीस तपासाबरोबरच महापालिकेच्या विभागीय चौकशीच्या निष्कर्षांकडे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai