जुन्या पिढीने नवे बदल स्वीकारण्याची गरज आहे
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 30
’जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष योगेश सोमण यांचे प्रतिपादन; जुन्या पिढीने बदल स्वीकारण्याचे आवाहन
नवी मुंबई : आजची युवा पिढी वाचत नाही, लिहीत नाही, अशी सातत्याने केली जाणारी टीका चुकीची आहे. ही पिढी वाचते, लिहिते; मात्र तिची वाचनाची माध्यमे आणि पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे नव्या पिढीवर आपल्या वाचनाच्या पद्धती लादण्याऐवजी जुन्या पिढीने बदल स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नवी मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार योगेश सोमण यांनी केले.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्थेच्या वतीने नेरूळ येथील तेरणा ऑडिटोरियममध्ये आयोजित दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, महापौर सुजाता पाटील, स्वागताध्यक्ष तथा कुसुमाग्रज वाचनालयाचे अध्यक्ष ललित पाठक, जयू भाटकर, क्रीडा समिती सभापती गिरीश म्हात्रे, स्वप्ना गावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.सोमण म्हणाले की, जेन झी ही केवळ भारतापुरती मर्यादित नसून जगभरातील पिढी आहे. त्यांना वाचनाची आवड नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. मोबाईल, सोशल मीडिया, वेब सीरिज, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून ही पिढी व्यक्त होते आणि शिकते. बटाट्याची चाळ किंवा श्यामची आई यांसारख्या साहित्यकृती नव्या पिढीला समजणार नाहीत, असे गृहीत धरणेही चुकीचे आहे. कारण त्यांचे अनुभवविश्व आणि जीवनशैली वेगळी आहे. फ्लॅट संस्कृतीत वाढलेल्या मुलांवर चाळ संस्कृतीचे संदर्भ लादण्याऐवजी त्यांच्या जगण्याशी संवाद साधला पाहिजे.
नव्या पिढीवर अविश्वास दाखवून संस्कार होत नाहीत. त्यांना वाचन, लेखन आणि अभिव्यक्तीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकच श्रेष्ठ, असा आग्रह न धरता नव्या पिढीच्या साहित्यिक अभिव्यक्तीलाही संधी दिली पाहिजे. स्त्रियांविषयी टवाळखोर विनोद थांबविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. नव्या पिढीशी संवाद साधा, त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांचे विचार समजून घ्या आणि कथा-कादंबऱ्या लिहिण्यास प्रोत्साहित करा, असे आवाहन त्यांनी केले.
- मराठीचा वापर अनिवार्य करा : गणेश नाईक
मुंबईतील सर्व माध्यमांच्या शैक्षणिक संस्था आणि शाळांमध्ये मराठीचा वापर व मराठी भाषेत संवाद अनिवार्य करण्यासाठी महापौरांनी पुढाकार घ्यावा. याबाबत सर्व शैक्षणिक संस्थांना निर्देश द्यावेत, अशी मागणी वनमंत्री गणेश नाईक यांनी केली. मराठी ही राज्याची भाषा असून तिचा प्रत्येकाच्या मुखात सन्मानाने वापर झाला पाहिजे. भाषेला सन्मान दिल्याने तिचा गौरव वाढतो, असेही ते म्हणाले. - मराठीसह इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही प्राधान्य : महापौर
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, काळाची गरज ओळखून नवी मुंबई महापालिकेने मराठीबरोबरच इंग्रजी माध्यमांच्या शाळाही सुरू केल्या आहेत, असे महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai