हॉलिडे पॅकेजच्या बहाण्याने 19 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 17, 2021
- 728
नवी मुंबई : वाशीतील गोलीजर इंटरनॅशनल हॉलिडे प्रा.लि.कंपनीने हॉलिडे पॅकेज देण्याचे अमिष दाखवून अनेक लोकांकडून लाखो रुपये उकळून त्यांना हॉलिडे पॅकेज न देता त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तींनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी सदर कंपनीच्या चार डायरेक्टरसह कंपनीतील कर्मचाऱयांविरोधात फसवणूकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात 17 जणांची तब्बल 19 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गोलीजर इंटरनॅशनल हॉलिडे प्रा.लि. कंपनीने 2017 मध्ये वाशी रेल्वे स्टेशन जवळच्या रियल टेक पार्क इमारतीतील 14 व्या मजल्यावर आपले कार्यालय थाटले होते. या कंपनीने त्यावेळी अनेक व्यक्तींच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांचा नंबर लकी ड्रॉमध्ये लागल्याचे तसेच या लकी ड्रॉ मध्ये गिफ्ट मिळणार असल्याचे अमिष दाखविले होते. तसेच त्यांना ट्रिपदरम्यान हॉटेलिंग, स्थानिक ट्रव्हेलींग, गाईड या सर्व सुविधा कंपनीतर्फे पुरविण्यात येणार असल्याचे तसेच पाच वर्षे दोन व्यक्तीसाठी जिम सुविधा, घरगुती कार्यक्रमासाठी बँकेट हॉल, नवी मुंबई परिसरात थ्रीस्टार हॉटेलमध्ये जेवण, सिनेमा या सुविधा देखील पुरविल्या जाणार असल्याचे आश्वासन सदर कंपनीकडून त्यावेळी देण्यात आले होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या ऐपतीप्रमाणे हॉलिडे पॅकेज घेऊन लाखो रुपयांची रक्कम गोलीजर इंटरनॅशनल हॉलिडे कंपनीला दिली होती. महिन्याभरानंतर काही सदस्यांनी कंपनीच्या कस्टमर केअरवर संपर्क साधुन त्यांच्या टुर पॅकेज व्यतिरिक्त मिळणाऱया फॅसीलीटीबाबत विचारणा केली असता, तांत्रिक कारण पुढे करुन त्यांना इतर सुविधा देता येणार नसल्याचे सांगून टाळले जात होते. 2019 मध्ये गोलीजर इंटरनॅशनल हॉलिडे कंपनीचे कार्यालय हावरे मॉलमध्ये स्थलांतर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हॉलिडे पॅकेज घेणाऱया नागरिकांनी त्याठिकाणी जाऊन कंपनीला भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर कार्यालय बंद असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर 17 व्यक्तींनी गत आठवड्यात वाशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी गोलीजर इंटरनॅशनल हॉलिडे प्रा.लि. या कंपनीचे डायरेक्टर आशिष शिवाजी जगताप, प्रसाद उर्फ दत्तात्रय अशोक मोरे, विशाल बंसीलाल भोर यांच्यासह कंपनीमधील कर्मचार्यांविरोधात फसवणूकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांचा शोध सुरु केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai