वाशीतील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन धुळखात
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 14, 2023
- 372
24 एप्रिलपर्यंत लोकार्पण न केल्यास अन्नत्याग करणार-कामगार नेते प्रदीप वाघमारे
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधींचा खर्च करून वाशी येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनाची उभारणी केली, मात्र अनेक वर्षे उलटूनही त्याचे लोकार्पण न करता या सुंदर इमारतीचे गोडाऊन केले आहे. सध्या या ठिकाणी वैद्यकीय साहित्य ठेवण्यात आले असून हे साहित्यसुद्धा ठेवून खराब झाले आहे. त्यामुळे भवनाचे 24 एप्रिलपर्यंत लोकार्पण करा, तसेच वैद्यकीय साहित्याचा योग्य तो विनियोग करा, अन्यथा अन्नत्याग करण्याचा इशारा कामगार नेते प्रदीप वाघमारे यांनी दिला आहे.
वाशीतील आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना छोटेमोठे कार्यक्रम करता यावेत म्हणून या सांस्कृतिक भवनात भव्य प्रमाणात सभागृहांची निर्मिती करण्यात आली आहे. कोविड काळाच्या आधीपासून ही तीन मजली इमारत बनून तयार आहे. मधल्या काळात कोविडची परिस्थिती उद्भवल्यामुळे सदर इमारतीत कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. कोविड काळ निघून गेला त्यानंतरही या इमारतीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे जुने सामान, गाद्या, पलंग, पी.पी.ई. किट, औषधे, गोळ्यांचे बॉक्स, तळमजल्यासह तीन मजल्यांवर भरून ठेवण्यात आले आहे. नागरिकांच्या वापरासाठी निर्माण केलेल्या इमारतीचे नवी मुंबई महानगरपालिकेने गोडाऊन करून ठेवले आहे.
इमारत तीन मजली असून छोट्यामोठ्या आकाराचे हॉल बनवण्यात आले आहेत. ही इमारत वाशी-कोपरखैरणे रस्त्यावर आहे. नागरिकांच्या हक्काच्या असलेल्या या इमारतीत नवी मुंबई महापालिकेने आरोग्य विभागाचे सामान ठेवले असल्यामुळे या इमारतीचे इतक्या वर्षांपासून लोकार्पण केले नाही. पालिकेने नागरिकांना या इमारतीच्या वापरापासून वंचित ठेवले आहे. 24 एप्रिलपर्यंत लोकार्पण करावे अन्यथा आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा पालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांना देण्यात आला आहे.
नवी मुंबईत पालिकेच्या अशा बऱ्याच मालमत्ता आहेत ज्या नागरिकांसाठी बनविण्यात आल्या आहेत, पण त्यांचे लोकार्पण न करता त्यांचा वापर स्वतः पालिकाच करत आहे. भविष्यात अशा सर्व मालमत्तां खुल्या करण्यासाठी आंदोलन करणार आहे. - प्रदिप वाघमारे, कामगार नेते
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai