तबला-बासरीच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 11, 2024
- 434
नवी मुंबई : नादवेणू संगीत अकादमीच्यावतीने ऐरोली येथे नमोस्तुते पर्व-2 हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध बासरी वादक पं. विवेक सोनार व तबलावादक उस्ताद फजल कुरेशी यांच्या सांगितीक जुगलबंदीने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. त्याचबरोबर नादवेणू संस्थेच्या 60 बासरी वादक आणि 20 हार्मोनियम वादकांनी विविध चित्रपटांतील गीते, लोकगीते, नाटसंगीत तसेच शास्त्रीय संगीतातील विविध रागांचे सादरीकरण करुन या संगीतमय सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
ऐरोली सेक्टर-5 येथील जानकीबाई मढवी हॉलमध्ये संपन्न झालेल्या या सर्वांग सुंदर कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. हार्मोनियमवर छोट्या विद्यार्थ्यांनी लकडी की काठी, अग्गोबाई ढग्गोबाई सारखी बालगीते वाजवून उपस्थितांची मने जिंकली. तब्बल 20 हार्मोनियम वादक आणि 60 बासरी वादकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. नाटगीतासारखा कठीण गीत प्रकार नादवेणूच्या विद्यार्थ्यांद्वारे बासरीवर सादर होत असताना मंत्रमुग्ध झालेल्या प्रेक्षकांनी उभे राहून त्यांना दाद दिली. तर अंकिता सुर्यवंशी यांच्या हार्मोनियम आणि आकाश सुर्यवंशी यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. त्यांना अर्णव आणि स्वप्निल भिसे यांनी तबल्यावर अप्रतिम साथ दिली. कार्यक्रमाच्या अंतिम पर्वात सुप्रसिद्ध बासरी वादक पं. विवेक सोनार आणि जगप्रसिध्द तबला वादक उस्ताद फझल कुरेशी यांच्यात तब्बल दीड तास रंगलेल्या जुगलबंदीने रसिक भारावून गेले.
- चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
याप्रसंगी सुप्रसिध्द बासरी वादक पं. विवेक सोनार आणि जगप्रसिध्द तबला वादक उस्ताद फझल कुरेशी यांच्याहस्ते चार विद्यार्थ्यांना अकादमीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून सोनार लिपी या नावाने नवीन डिजिटल लिपीचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, वाद्यांच्या माध्यमातून संगीताची सेवा घडावी हा या कार्यक्रमामागील मूळ उद्देश होता. रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता हा उद्देश साध्य झाल्याचे नमोस्तुते कार्यक्रमाचे आयोजक आकाश सुर्यवंशी यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai