गृहनिर्माण योजनांसाठी ‘हाउसिंग स्टॉक’
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 29
एकाच पोर्टलवर मिळणार राज्यातील घरांची माहिती
मुंबई : सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकर पूर्ण करण्यासाठी राज्यात विविध गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच घरांच्या व्यवस्थापनासाठी, विक्रीसाठी आणि देखभालीसाठी आता एकच पोर्टल विकसीत करण्यात येणार आहे. या सर्व कामांना अधिक गती देऊन प्रकल्प दर्जेदार पद्धतीने तत्परतेने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे गृहनिर्माण विभागांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि इतर योजनांतर्गत उपलब्ध गृहसाठा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले.
बैठकीस गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गृहनिर्माण प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक वेगवान करण्यात यावी. जेणेकरून विहित कालावधीत प्रकल्पांचे काम पूर्ण होऊन घरांचे वितरण नागरिकांना करण्यास सुरुवात होईल. कामांचा दर्जा आणि गुणवत्ता याला प्राधान्य देत नियमानुसार प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या संपूर्ण घरांच्या व्यवस्थापनासाठी, विक्रीसाठी आणि देखभालीसाठी एक स्वतंत्र संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप विकसित केले जाणार असून, या प्रक्रियेमुळे राज्यातील परवडणाऱ्या घरांच्या वितरणात अधिक सुटसुटीतपणा येईल.
नोंदणी मोहिमेला उत्तम प्रतिसाद
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत णथझ वेब पोर्टलवर सुरू असलेल्या लाभार्थी नोंदणी मोहिमेत 30 जुलै 2026 पर्यंत राज्यात एकूण 4,21,083 लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
- ‘गृहनिर्माण साठा‘ व्यवस्थेचा आढावा
राज्यातील नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवण्यासाठी आणि विविध प्राधिकरणांकडे उपलब्ध असलेल्या घरांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ‘गृहनिर्माण साठा व्यवस्थापन व महाराष्ट्र निवारा निधी सक्षमीकरण’ या महत्त्वाकांक्षी धोरणाचा यावेळी आढावा घेण्यात आला. म्हाडा, सिडको, एसआरए यांसारख्या विविध प्राधिकरणांकडे उपलब्ध घरांच्या वितरणासाठी आणि व्यवस्थापनासाठी एकात्मिक यंत्रणा उभी केली जात आहे.
- एकाच पोर्टलवर उपलब्ध होणार घरांची माहिती
राज्यातील म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, बीएमसी आणि एसआरए प्राधिकरणांच्या माध्यमातून उपलब्ध होणारी घरे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या गृहनिर्माण योजनांमधील रिक्त घरांचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व घरांची माहिती एकाच पोर्टलवर संकलित करून ‘हाउसिंग स्टॉक’ तयार करण्यात येत आहे. याद्वारे दिव्यांग, गिरणी कामगार, माथाडी कामगार, डबेवाले आणि तृतीयपंथीय यांसारख्या विशेष प्रवर्गांसाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
या धोरणानुसार राज्यात विविध प्राधिकरणांकडे पुढील प्रमाणे सदनिका उपलब्ध आहेत:
- म्हाडा : 15,291 सदनिका तसेच सिडको : 11,830 सदनिका तर
- स्थानिक स्वराज्य संस्थांकडे : 13,575 घरे आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण : 2,281 सदनिका आणि
- शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित : 84 सदनिका
- (शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत 3,945 सदनिका तात्पुरत्या स्वरूपात विविध प्राधिकरणांना ट्रान्झिट कॅम्प म्हणून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत).
प्राधान्यक्रमाने वितरणाची रूपरेषा
घरांचे वितरण करताना तीन प्रमुख श्रेणींमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे
अ) प्राथम्यक्रमाने वितरण: धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण सदनिका, शासकीय प्रकल्पांतील विस्थापितांसाठी प्रकल्पग्रस्त सदनिका, आणि सीआरझेड, कांदळवन किंवा डोंगरउतारावरील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी कायमस्वरूपी संक्रमण सदनिका वितरित केल्या जातील.
ब) भाडेतत्त्वावर घरे: आपत्कालीन किंवा अपवादात्मक स्थितीत खासगी विकासकास संक्रमण गाळे व भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध करून दिली जातील.
क) शिल्लक घरांचे वितरण: प्रथमपी एमएवाय (शहरी) निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, नंतर संबंधित प्राधिकरणाच्या सोडत पद्धतीने आणि त्यानंतरही घरे शिल्लक राहिल्यास “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर घरे दिली जातील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai