विमानतळ नामकरणासाठी भुमिपुत्रांची जंतर-मंतरवर हाक
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 08, 2026
- 33
पनवेल ः देशाची राजधानी नवी दिल्ली गुरुवारी कोकणाच्या बुलंद आवाजाने दणाणून गेली. रायगड, ठाणे, भिवंडी तसेच संपूर्ण कोकणातून हजारोंच्या संख्येने महिला-पुरुषांनी एकत्र येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, अशी एकमुखी व ठाम मागणी केली. यासाठी जासई ते दिल्ली दिबांची वारी दिल्लीच्या दारी या नावाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. ही केवळ नामकरणाची मागणी नसून शेतकरी, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या स्वाभिमानाची लढाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई विमातळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देणारा ठराव केंद्रीय मंत्री मंडळाकडे पाठविला आहे. तर नुकताच या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये असंतोष पसरला आहे. 24 जून या दि. बा. पाटील यांच्या जन्मदिनी चिंचपाडा येथे उपोषण करण्यात आले तर 8 जुलैला पनवेल ते मंत्रालय असा पायी मोर्चा ही काढण्यात आला होता. मात्र या मोर्चेकरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही राज्य सरकार कडून केवळ आश्वासनच देण्यात आले होते. त्यानंतर भूमिपुत्रांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागील पाच वर्षांपासून नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्रांचे आंदोलन सुरू आहे. मात्र आश्वासना शिवाय काही मिळालं नाही. त्यामुळे बुधवारी भूमिपुत्रांनी थेट दिल्लीत जंतर मंतर येथे जाऊन या मागणीसाठी आवाज बुलंद करीत निदर्शने केली. यासाठी बसने रेल्वेने आणि विमानाने मुंबई, रायगड,नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथील शेकडो भूमिपुत्र पोहचले होते.
दिल्लीतील या विराट आंदोलनामुळे दि. बा. पाटील विमानतळ नामकरण संघर्ष समितीने राज्य व केंद्र सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की, हा केवळ प्रतीकात्मक निषेध नसून जनतेच्या हक्कासाठी उभारलेले व्यापक लोकआंदोलन आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव अधिकृतपणे मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्रतेने, लोकशाही मार्गाने आणि अखंडपणे सुरू राहणार, असा निर्धार संघर्ष समितीने पुन्हा एकदा व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai