कोव्हिड योद्धा सर्व अर्जदारांना मिळाले घर
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 16, 2021
- 661
विशेष गृहनिर्माण योजनेतील घरांसाठी संगणकीय सोडत संपन्न
नवी मुंबई ः सिडको महामंडळाच्या कोविड योध्दे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी 15 नोव्हेंबर 2021 रोजी संगणकीय सोडत संपन्न झाली. ज्या अर्जदारांना सोडतीमध्ये घर प्राप्त झाले नाही, परंतु योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरली होती अशा सर्व अर्जदारांना सोडत प्रक्रीयेद्वारे सदनिका अदा करण्यात आल्या आहेत. यात प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांचादेखील समावेश करण्यात आला आहे.
कोविड-19 महासाथीच्या काळात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य व सफाई कर्मचारी, पोलीस आणि अन्य गणवेषधारी कर्मचार्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता, समाजाप्रति आपले कर्तव्य बजावत अनेकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या कार्याप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून सिडकोकडून, शासनाच्या मार्गदर्शनाखाली 15 ऑगस्ट 2021 रोजी कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजने अंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये एकूण 4,488 घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. एकूण 4,488 घरांपैकी 1088 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर उर्वरित 3400 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता होती.
या योजनेची पहिली सोडत 29 ऑक्टोबर 2021 रोजी काढण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित घरांसाठी आणि अनामत रकमेचा भरणा केलेल्या परंतु ज्यांना अद्याप घर वाटपित झालेले नाही अशा सर्व अर्जदारांकरिता दुसरी संगणकीय सोडत 15 नोव्हेंबर 2021 रोजी काढण्यात आली. दुसर्या सोडतीमध्ये प्रतीक्षा यादीतील उर्वरित सर्व अर्जदारांना घर वाटपित करण्यात आले आहे. या सोडतीमध्ये अर्जदारांनी ज्या ठिकाणास प्राधान्य दिले आहे त्या पेक्षा वेगळ्या ठिकाणचे घर त्यांना वाटपित करण्यात आलेले असू शकते. सदनिकांचा स्वीकार करण्यासाठी अर्जदारांना 15 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. सदनिका स्वीकारणे अर्जदारास बंधनकारक असणार नाही. सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या नावांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर विशेष गृहनिर्माण योजना अशा प्रकारे साकारण्यात आली होती की जरी अर्जदार प्रथम सोडतीत अयशस्वी ठरला तरी प्रत्येक अर्जदाराला उपलब्ध असलेल्या स्थळी सदनिका मिळेल. या सोडतीच्या माध्यमातून ‘प्रत्येक अर्जदारास घर’ या सिडकोने दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यात आली.
डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai