एपीएमसीत हापूसच्या 14 हजार पेट्या; यंदा अल्प आवक
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2026
- 25
नवी मुंबई : दरवर्षी प्रथेप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्यामुहूर्तावर एपीएमसीमध्ये हापूस आंब्याची आवक झाली. मात्र यंदा आवक कमी झाल्याने सध्यातरी आंब्यांचे दर चढेच राहणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एपीएमसी फळ बाजारात सुमारे 14 हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या.
दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एपीएमसीच्या फळ बाजारात सुमारे 40 ते 50 हजार पेट्या दाखल होत असतात. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा आंबा बाजारात दाखल झाला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने हापूस आंब्याला चांगली मागणी असते. हापूस खरेदीसाठी ग्राहकांकडूनही दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. यंदा मात्र बाजारात दरदिवशी सरासरी 4 ते 5 हजार हापूस आंब्याच्या पेट्या येत असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 13 हजार 925 पेट्या दाखल झाल्या आहेत. ही आवक दरवर्षीच्या हंगामाच्या तुलनेत अतिशय अल्प मानली जात आहे. आवक मर्यादित असल्याने दर चांगलेच वाढले आहेत. सध्या हापूस आंब्याच्या आकार आणि प्रतीनुसार प्रति पेटी 3 हजार ते 10 हजार रुपये असा दर मिळत असून, येत्या काळातही दरात किंचित फरक सोडला तर मोठे बदल होण्याची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा कोकणात हवामानातील बदल, अवेळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेमुळे सुमारे 80 टक्के हापूस आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात येणारा माल कमी असून मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा ठरतो आहे. या पार्श्वभूमीवर हापूस आंबा यंदा संपूर्ण हंगामात महागच राहणार असल्याचे आंबा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या 5-6 वर्षांच्या गुढीपाडव्याच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याची आवक अतिप्रमाणात कमी आहे. बदलत्या वातावरणामुळे कोकणातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, आंब्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. हापूस आंब्याचा मुख्य हंगाम एप्रिल महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यावेळी दर काहीसे कमी होण्याची शक्यता असली तरी दरवर्षीच्या तुलेनत दरांमध्ये फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे यंदा हापूस आंबा खरेदीसाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai