आदिवासी महिलांसाठी आरोग्य जनजागृती
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2026
- 29
उलवेः महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत रानसाई, उलवे येथील आदिवासी पाड्यात मोफत पुनर्वापर करता येणाऱ्या सॅनिटरी पॅडचे वाटप व जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश केवळ सॅनिटरी पॅड वाटप नसून महिलांना मासिक पाळीबाबत योग्य माहिती देणे हा होता.
या कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. पाळीदरम्यान योग्य स्वच्छता राखली नाही तर संसर्ग होण्याची शक्यता वाढते, तसेच जुन्या, अस्वच्छ कापडांचा किंवा निकृष्ट दर्जाच्या पॅडचा वापर केल्याने गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असे सांगितले. विशेषतः पुनर्वापर करता येणाऱ्या सॅनिटरी पॅडचा वापर करण्याचे फायदे सांगण्यात आले. पाळीदरम्यान आवश्यक असलेल्या पोषण आहाराबद्दल देखील माहिती देण्यात आली. महिलांनी लोहयुक्त अन्नपदार्थ जसे की पालक, खजूर, गूळ तसेच संतुलित आहार आणि पुरेसे पाणी घेणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळीबाबत असलेल्या समाजातील गैरसमज यावरही चर्चा करण्यात आली. महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून सहभाग नोंदवला, त्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताजणे यांनी या कार्यक्रमासाठी नेचर केअर सामाजिक संस्था आणि श्री समर्थ कृपा सखी स्वसहायता संस्था तसेच सर्व समिती सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
उरण ः उरण तालुक्यातील डाऊन नगर येथे आदिवासी महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था, उरण, शिवराज युवा प्रतिष्ठान आणि श्री लक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
या कार्यक्रमामध्ये महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्याचे महत्त्व, सॅनेटरी नॅपकिनचा योग्य वापर तसेच महिलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती श्री लक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताजने यांनी दिली. तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित आदिवासी महिलांना डाबर कंपनीच्या वतीने शाम्पू, ज्यूस व सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थित महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यतेच्या अध्यक्षा संगीता ढेरे यांनी देखील महिलांना बचत गट कसे स्थापन करावे व त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. आई माऊली ग्राम संघाच्या अध्यक्ष अनु पाटील यांनी देखील बचत गटाची माहिती देऊन स्वतः त्या महिलांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सचिन ढेरे, सचिव कविता राकेश म्हात्रे, श्री लक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताजने, महिला सक्षमीकरण प्रकल्प समन्वयक सुनेना चौधरी, आई माऊली ग्राम संघ अध्यक्ष अनुताई पाटील, वंदना म्हात्रे -अंगणवाडी सेविका, सोनाली ठाकूर -ग्रामपंचायत सदस्या यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai