मतदार याद्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला सहकार्य करा
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2026
- 21
नागरिकांना आवाहन
नवी मुंबई - भारतीय लोकशाही प्रक्रियेचा कणा असलेल्या मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यापूर्वी सन 2002 मध्ये विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम झाला होता. सद्यस्थितीत लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये सन 2024 ची मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या 2024 च्या मतदार यादीतील मतदारांचे सन 2002 मधील अंतिम मतदार यादीतील मतदारांशी ताळमेळ घालण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयास भेट देत आयुक्त डॉ. कैलास शिंदे व संबंधित अधिकारी यांचेकडून मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला आणि कामाला गती देण्याचे निर्देशित केले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी, 150 ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी प्रिती पाटील व 151 बेलापूर विधानसभा मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी अश्विनी पाटील यांच्यासमवेत सर्व विभाग अधिकारी तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी यांची विशेष बैठक घेतली. यावेळी निवडणूक विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे उपस्थित होते.
सदर काम जलद गतीने व विहित वेळेत अचूक पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व बीएलओ यांची असून यामध्ये पालिकेसह विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचारी, शिक्षक, आशा वर्कर यांचा समावेश आहे. यामध्ये नियुक्त केलेले काही बीएलओ कामचुकारपणा करीत असल्याचे तसेच काही कर्मचाऱ्यांना बीएलओची नियुक्तीपत्रे बजावूनही ते आपल्या कर्तव्यावर हजर होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा कर्तव्याशी प्रतारणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निर्देश यावेळी देण्यात आले. बीएलओ यांना त्यांच्या मतदान केंद्र कार्यक्षेत्रातील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी व त्यांच्यामार्फत योग्य माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिक पातळीवर नगरसेवक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे. नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांना याकामी संपूर्ण सहयोग करण्याचे आवाहन करण्याचे सूचित करण्यात आले.
मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सध्या अस्तित्वात असलेल्या मतदार यादीतील अस्पष्ट, आकार विरहित व अमानवी छायाचित्रांशी पडताळणी करणे तसेच तर्कहीन चुका व अनाकलनीय नोंदींची वगळणी करणे, डेमोग्राफीकल सिमीलर इन्ट्रीजची पडताळणी करणे व वगळणी करणे अशी कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बिएलओ यांच्यामार्फत करण्यात येत आहेत. सदर मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम हा विश्वासार्ह, स्वच्छ व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असून या उपक्रमात नागरिकांनी स्वत:हून सहभागी होणे महत्वाचे आहेत. एकही पात्र मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये व एकही अपात्र नाव मतदार यादीत असू नये हा या मोहीमेचा मुख्य उद्देश असून नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता स्वत: पुढाकार घेऊन मतदार यादीत आपले नाव तपासणे लोकशाहीच्या सबलीकरणासाठी महत्वाचे आहे.
यापुढील काळात लवकरच मतदार यादीत नावे न आढळलेल्या मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुरु होणार असल्याने प्रत्येक मतदाराने सन 2002 च्या यादीशी आपले नाव मॅपिंग करुन घेणे महत्वाचे आहे. सदर पडताळणी न झाल्यास व मतदार यादीतून नाव वगळण्यात आल्यास पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया पार पाडावी लागेल याचीही नोंद नागरिकांनी घ्यावी व आपल्या नावाचे मॅपिंग करुन घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. तरी याव्दारे 150 ऐरोली विधानसभा व 151 बेलापूर विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपले नाव बीएलओ मॅपिंग ॲपमध्ये मॅपिंग झाले असल्याची खातरजमा करुन घ्यावी व आपल्या घरी येणाऱ्या बीएलओ यांना संपूर्ण व सत्य माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai