40 हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 34
ठेकेदारावर महापालिकेचा दंडाचा बडगा; 15 ऑगस्टची अंतिम मुदत; जुन्या गणवेशावरच स्वातंत्र्यदिन?
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका शाळांमधील सुमारे 40 हजारांहून अधिक विद्यार्थी अद्याप नवीन शालेय गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने 15 जुलैपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते. मात्र, ठेकेदाराकडून वेळेत पुरवठा न झाल्याने हे उद्दिष्ट फसले असून, संबंधित ठेकेदाराला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. करारातील अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली.
महापालिकेने बालवाडी ते दहावी तसेच सीबीएसई शाळांमधील 50 हजार 550 विद्यार्थ्यांना दैनंदिन, क्रीडा आणि स्काऊट-गाईड गणवेश पुरविण्यासाठी 13 कोटी 33 लाख 30 हजार 255 रुपयांचे कंत्राट मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला दिले आहे. यासाठी 8 मे रोजी कार्यादेश जारी करण्यात आला होता. करारानुसार 15 जुलैपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करणे बंधनकारक होते. मात्र, प्रशासकीय प्रक्रियेला झालेला विलंब आणि त्यानंतर ठेकेदाराकडून झालेला संथ पुरवठा यामुळे गणवेश वितरण रखडले. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळाला आहे. परिणामी, 40 हजारांहून अधिक विद्यार्थी अद्याप नवीन गणवेशापासून वंचित आहेत. अनेक विद्यार्थ्यांना नियमित गणवेशाचा संपूर्ण संच मिळालेला नसून काहींना केवळ क्रीडा गणवेश किंवा पावसाळी साहित्य देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशात किंवा इतर कपड्यांमध्ये शाळेत जावे लागत आहे. 15 ऑगस्टपर्यंत वितरण पूर्ण न झाल्यास स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदनही अनेक विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशात करावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, गणवेश पुरवठ्याचे काम महिला बचत गटांकडे देण्याचा प्रस्ताव चर्चेत आला होता. मात्र, तांत्रिक अटी आणि उत्पादन क्षमतेअभावी तो पुढे गेला नाही. त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार हे कंत्राट मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड यांना देण्यात आले.
करारातील मुदत पाळण्यात अपयश आल्याने शिक्षण विभागाने 10 जुलै आणि 21 जुलै रोजी दोन कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने करारातील तरतुदीनुसार दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करारानुसार 15 जुलैनंतरच्या पहिल्या आठवड्यासाठी 0.5 टक्के, दुसऱ्या आठवड्यासाठी 1 टक्का, तिसऱ्या आठवड्यासाठी 1.5 टक्के आणि चौथ्या आठवड्यासाठी 2 टक्के दंड आकारला जाणार असून, ही रक्कम ठेकेदाराच्या अंतिम देयकातून कपात केली जाणार आहे. महापालिकेने आता 15 ऑगस्टपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्याचे नवे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, यापूर्वीची मुदतही हुकल्याने नव्या मुदतीत तरी सर्व विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश पोहोचतो का, याकडे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचे वाटप सुरू आहे. कंत्राटदार व महापालिका प्रशासनाच्या चर्चेनंतर गणवेश वितरण पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वितरणात झालेल्या विलंबाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.-संघरत्ना खिल्लारे, शिक्षण उपायुक्त, नवी मुंबई महापालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai